जातं व जात्यांवरील ओव्या इतिहासजमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:26 AM2020-02-16T00:26:34+5:302020-02-16T00:26:45+5:30
नवीन तंत्रज्ञानात जुनी साधने अडगळीत । ग्रामीण घराघरांतून ऐकू येणारे सूर हरवले
राहुल वाडेकर
विक्रमगड : पूर्वी पहाटेच्या रामप्रहरी ग्रामीण भागातील घराघरांतून ऐकू येणाऱ्या जात्यावरील ओव्यांचा सूर व जातं आता सध्याच्या आधुनिक युगामध्ये इतिहासजमा झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याने जुनी साधने अडगळीत पडल्याचे, कालबाह्य झाल्याचे जाणवत आहे. यातीलच एक घरगुती व आरोग्यासाठी पोषक असलेले दळणाचे साधन म्हणजेच विशिष्ट दगडाचे तयार केलेले जाते. या जात्याशी ग्रामीण भागातील महिलांशी अनन्यसाधारण महत्त्व होतं. लग्न कार्यात, समारंभाप्रसंगी जात्यावरील हळद दळणे व त्या वेळी गाणे म्हणण्याची पद्धत प्रचलीत होती. शिवाय घरोघरी पहाटेच्या प्रहरी ऐकू येणारी जात्याची घरघर व महिलांच्या आवाजातील बहिणाबाईच्या ओव्या लुप्त झाल्या असून त्या ऐकावयास मिळत नाही. एखादा सण उत्सव असल्यास घरामध्ये त्या त्या प्रकारचे गोडधोड करण्यासाठी तांदूळ, मूग, तूरडाळ आदी धान्येही जात्यावर दळली जात होती. त्यामुळे जाते हे पूर्वी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा एक अविभाज्य घटक होते. आता बदलत्या जमान्यात काळानुरूप विजेवर चालणाºया पिठाच्या गिरण्या, गावोगावी-खेडोपाडी दिसून येतात.
गिरणीमध्ये दळणासाठी गोलाकार दगडाची रचना असते. त्यात विशिष्ट प्रकारच्या खाचा पाडलेल्या असतात. ही पद्धत पूर्वीच्या जात्याची आहे. आता घरोघरी घरघंटी उपलब्ध झाल्या आहेत. पिठांच्या गिरण्यांमध्येही स्पर्धा वाढू लागली आहे. परंतु या सर्व गोष्टीत पारंपरिक जाते मात्र काळानुरूप इतिहासजमा झाले आहे. पूर्वी प्रत्येक घरोघरी असणारे जाते आता दिसून येत नाही. यामुळे कुटुंबातील हा प्रमुख घटक दुर्लक्षित झाला आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा परिणाम याचेच हे मुख्य कारण आहे.
विक्रमगडमध्ये राहणाºया ८३ वर्षांच्या आजीबाई यमुनाबाई बाळकृष्ण मुळे या आजही आपल्या घरात पारंपरिक जात्याचा वापर करीत आहेत. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आज आधुनिक युगामध्ये नवनवीन बदल झालेले असले तरी मी पूर्वी चालत आलेल्या, माझ्या सासूने मला दिलेल्या जात्याचा वापर मी करीत आहे. या जात्यावर दळणारे सर्व पदार्थ बारीक होऊन आरोग्याच्या दृष्टीने नवीन युगातील मशनरीपेक्षा जास्त फायदे देणारे आहे. मी आजही यावरच धान्य दळते.