कर वसुली करण्याकरिता नवीन उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:24 PM2019-02-12T23:24:44+5:302019-02-12T23:24:55+5:30
विरार वसई महानगरपालिकेने कर वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिकेने कर न भरणाऱ्यांची नावे फलकावर लिहून ते फलक रस्त्याच्या मध्यभागी लावले आहे.
विरार : विरार वसई महानगरपालिकेने कर वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिकेने कर न भरणाऱ्यांची नावे फलकावर लिहून ते फलक रस्त्याच्या मध्यभागी लावले आहे. तसेच थकबाकी न भरल्यास पाणी पुरवठा खंडित केला जाईल असा इशारा देखील पालिकेने दिला आहे.
महापालिकेने नागरिकांना गेल्या अनेक वर्षात बºयाच सुविधा पुरवल्या आहेत तर या बदल्यात योग्य ती रक्कम कर म्हणून नागरिकांकडून घेतली आहे. पण काही नागरिकांनी अजूनही नियमित कर भरलेला नाही. अशा नागरिकांकडून कर वसूली करण्याकरीता शक्य असेल ती मोहीम महापालिका राबवत आहे. करांची उर्वरीत रक्कम नागरिकांकडून वसूल करण्याकरिता महापालिका शक्य असलेले सर्व प्रयत्न करत आहेत.
२०१८-१९ मध्ये ९४७ जप्ती वसुली झालेल्या आहेत. २०१६-१७ मध्ये १२७ कोटींचा कर वसूल करण्यात आला तर २०१७-१८ मध्ये १६५ कोटींची कर वसूली झाली होती. यावर्षी महापालिकेने १८० कोटींचा आकडा पार केलेला आहे व ३०० कोटींचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. आता पर्यंत कर वसुली करण्याबाबत व त्या बद्दल लोकांची मानसिकता बदलावी यासाठी महापालिका अधिकाºयांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली, बाईक रॅली देखील काढली होती. सर्व प्रयत्न झाले तरी ज्याची जास्तच कर रक्कम बाकी आहे, अशा नागरिकांची नावे फलकावर लिहिण्यात आली आहेत. तसेच आचोळे, पेल्हार, चंदनसार, अर्नाळा, नवघर, माणिकपूर, वसई, बोळींज, वालीव या ९ प्रभागसमिती मधील थकबाकी असलेल्या नागरिकांची नावे फलकावर लिहून ते मुख्य रस्त्यावर देखील लावण्यात आले आहे. तर काही ठिकाणी कायदेशीर कारवाई करीत असताना शेवटचा टप्पा हा पाणी पुरवठा खंडित करण्याचा असतो तर महापालिकेने हे पाऊल देखील उचलले आहे. आतापर्यंत पालिकेने २०० नळ जोडण्या तोडल्या आहेत. ज्या नागरिकांची सर्वात जास्त कर थकबाकी आहे किंवा ज्यांना थोडीही मुदत दिली जाऊ शकत नाही अशा नागरिकांवर महापालिका अशा प्रकारे कारवाई करीत आहे.
याचप्रमाणे महापालिका कर्मचारी मोठ मोठ्या इमारतींखाली टेबल लावून बसतात जेणे करून नागरिकांना महापालिकेत जावे लागणार नाही. नागरिकांनी या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. ज्यांना कर कुठे भरायचे हे माहित नाही किंवा कर कोणाकडे जमा करायचे हे माहित नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. तसेच शनिवार, रविवार देखील मालमत्ता कर विभाग सुरु ठेवण्यात आला आहे. नोकरी करणाºया नागरिकांना रविवारी सुट्टी असते, अशा नागरिकांसाठी देखील पालिकने उपाय योजना केली आहे.
कर वसूल करण्याकरिता जे लागेल ते कायदेशीर प्रयत्न पालिकेकडून केले जात आहेत. नागरिकांनी लवकरात लवकर या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन उर्वरीत थकबाकी भरावी असे आवाहन महापालिका मालमत्ता कर विभागा कडून केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत.
आम्ही जे काही उपक्र म राबवत आहोत ते सगळे कायदेशीर आहेत आणि जे नवीन उपक्रम सुरु केले आहेत त्यांना देखील नागरिक प्रतिसाद देत आहेत. नागरिक इतर सर्व गोष्टींचे पैसे लगेच भरतात पण महापालिके कडे दुर्लक्ष करतात त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. - संजय हेरवाडे, मनपा उपआयुक्त