जिल्ह्यात आता नवी राजकीय समीकरणे आली उदयास; भाजप बॅकफूटवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:53 PM2020-01-13T22:53:09+5:302020-01-13T22:53:22+5:30
सामाजिक क्षेत्रातील जिजाऊची राजकारणात एंण्ट्री
रवींद्र साळवे
मोखाडा : पालघर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करा, असे आवाहन प्रचारादरम्यान सेना-राष्ट्रवादीचे नेते मंडळी करत होते. या आवाहनाला जणू लोकांनी प्रतिसाद दिला आणि जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा धुव्वा उडाला. यामुळे जिल्हा परिषदेतील नंबर १ चा पक्ष नंबर ३ वर गेला. या वेळी जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण उदयास आले. यानुसार सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जिजाऊची राजकारणात एंट्री झाली.
राष्ट्रवादीची सरशी झाली. यातून भाजपचा बालेकिल्ला एकदम ढासळला. यामुळे भाजप जिल्ह्यात बॅकफूटवर गेला आहेच, त्याचबरोबर जिल्ह्यात सध्या लोकसभा, विधानसभा आणि जि.प.तूनही भाजप हद्दपार झाल्याचे चित्र आहे. विक्रमगड नगरपंचायतीमध्ये जिजाऊने काँग्रेससोबत निवडणूक लढवून नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवले. या वेळी एका सदस्याची गरज असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. या वेळीच खरे तर भविष्यातील सांबरे-भुसारा एकत्रीकरणाची नांदी ठरली होती. त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत झाली. जिजाऊ आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित येऊन भाजपचा धुव्वा उडवत राष्ट्रवादी जिल्ह्यात नंबर २ चा पक्ष ठरला आहे.
विक्रमगड विधानसभा म्हणजे भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र या वेळी लोकसभेला महाआघाडीने भाजपपेक्षा जास्त मते मिळवली होती, तर विधानसभेत २१ हजारांच्या मताधिक्क्याने भाजपला हरवत सुनील भुसारा आमदार झाले. तेव्हाच खरे तर भाजपची पीछेहाट होत होती. भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपला शह देण्यासाठी नीलेश सांबरे यांची जिजाऊ आणि आमदार सुनील भुसारा यांची चाणक्यनीती कामी आली. जर जिजाऊ स्वबळावर आणि राष्ट्रवादीही स्वतंत्र लढली असती तर मात्र चित्र वेगळे असते. यामुळे भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी-जिजाऊ एकत्र आली आणि ही खेळी यशस्वीही ठरली. या सगळ्यात भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा विक्रमगड तालुका लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांत ढासळला. यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने घडली, ती म्हणजे पालघर पर्यायाने कोकणात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली ही संस्था आता राजकारणात आली आहे.
संघटनेचा प्रभाव
जिजाऊ संघटनेची आता नव्या दमात राजकारणात एंट्री झालेली आहे. जिल्ह्यातील येणाºया सर्व निवडणुकांत संघटनेचा प्रभाव राहील, अशी स्थिती असल्याने सर्वच राजकीय पक्षांना आता जिजाऊची दखल घ्यावी लागणार आहे.