पालघर जिल्ह्यात पहिल्या राष्ट्रध्वजाच्या पुण्यस्मरणाचा नवा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 10:55 PM2018-08-23T22:55:37+5:302018-08-23T22:56:18+5:30
किल्ले वसई मोहीम परिवाराचा उपक्रम; १११ वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ ३२ दुर्गमित्रांची ३६ किल्ल्यांवर मोहीम
नालासोपारा : मादाम कामा यांनी सन १९०७ मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा आद्य राष्ट्रध्वज फडकवला. त्या गौरवशाली क्षणाला यंदा १११ वर्ष पूर्ण झाली. तसेच कामा यांचा १२ आॅगस्टलाच स्मृतिदिन होता. या दिनाचे व ध्वजाचे पुण्यस्मरण करण्यासाठी किल्ले वसई मोहीम परिवारा अंतर्गत १८ व १९ आॅगस्ट रोजी पहिल्या राष्ट्रध्वजाचे पुण्यस्मरण व गडकोट अभ्यास सफर आयोजित करण्यात आलेली होती.
वसई किल्ल्यात वसई विरार महानगरपालिका माजी महापौर नारायण माणकर व विद्यमान उपमहापौर प्रकाश रॉड्रिंक्स यांच्या हस्ते मोहिमेचे शुभारंभ करण्यात येऊन पहिल्या राष्ट्रध्वजाचे स्मरण नरवीर चिमाजी अप्पा स्मारकात सकाळी ७ वाजता करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तयार झालेल्या राष्ट्रध्वजांची गौरवशाली परंपरा जपणे व दुर्ग संवर्धन हे आपले कर्तव्य आहे असे मत मानकर यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. उपमहापौर प्रकाश रॉड्रिंग्ज यांनी दुर्गिमत्रांशी दुर्गसंवर्धन व इतिहास संवर्धन या विषयावर संवाद साधला.
याद्वारे तब्बल ३६ गडकोटांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाचे पुण्यस्मरण करण्यात आले. या मोहिमेचे दुर्गसंवर्धन प्रमुख आतिष पाटील उमेळे व जयदीप चौधरी उमेळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम सर करण्यात आली.
या मोहिमेत वसई, आगाशी, वर्जगड, मांडवी, दहिसर, विराथन, तारापूर, चिंचणी, डहाणू, दातीवरे, हिराडोंगरी, एडवण, कोरे, सेवगा, आसावा, मुर्धा कोट, जंजिरे धारावी, जंजिरे अर्नाळा, मथाने, एडवण, कोरे, अशेरी, माहीम कोट, शिरगाव कोट अशा गडकोटांवर दुर्गमित्रांना सहभागी करून पहिल्या राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. गडकोटांच्या परिसरातील दर्गमित्रांचा व स्थानिकांचा वाढता सहभाग हे या मोहिमेचे वैशिष्ट्य ठरले. जंजिरे धारावी, मुर्धा कोट, माहीम कोट, केळवे कस्टम कोट या ठिकाणी स्थानिक मंडळींनी घेतलेला सक्रि य सहभाग हे मोहिमेचे विशेष ठरले.
जिल्ह्यातील अज्ञातवासात गेलेल्या व दुर्गसंवर्धनाची प्रचंड आवश्यकता असणाऱ्या गडकोटांना किल्ले वसई मोहीम परिवाराने सातत्यपूर्ण श्रमदान मोहिमेने एक नवी दिशा मिळवून दिलेली आहे. २०१५ मध्ये २६, २०१६ मध्ये ३० गडकोटांवर, २१०७ साली ३३ गडकोटांवर ही मोहिम यशस्वी झाली आहे.
दुचाकीद्वारे खडतर प्रवास
या मोहिमेत डहाणू, सफाळे, मुंबई मालाड ,वसई इत्यादी भागातील एकूण ३२ दुर्गमित्र आल्या दुचाकी व खाजगी वाहनांद्वारे दोन दिवसांच्या या खडतर मोहिमेत सहभागी झाले होते. इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी मोहिमेतील सर्व गडकोटांवर इतिहास मार्गदर्शन व नरवीरांच्या पराक्र माचे संदर्भ याचा लेखाजोगा मांडला.