वारली चित्रशैलीतून साकारतोय शुभेच्छांचा नवा ट्रेंड, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी व धुळवडीच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 03:07 AM2021-03-31T03:07:17+5:302021-03-31T03:07:59+5:30
होळी आणि धुळवड सणाच्या शुभेच्छा वारली चित्रशैलीतून व्यक्त करीत उत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने होळी व व धुळवड साजरी करण्यास निर्बंध लादले.
बोर्डी : होळी आणि धुळवड सणाच्या शुभेच्छा वारली चित्रशैलीतून व्यक्त करीत उत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने होळी व व धुळवड साजरी करण्यास निर्बंध लादले. त्यामुळे नेटकऱ्यांकडून हा ट्रेंड फॉलो होताना दिसला.
पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मार्च महिन्यापासून वाढ नोंदवली जात आहे. जिल्हा प्रशासनाने रात्री ८ ते सकाळी ७ या काळात संचारबंदी लागू केली आहे. तर धूलिवंदन साजरा न करण्याचे आदेश जारी केले होते. होळी सणाला येथील प्रत्येक समाजाच्या संस्कृतीत प्रमुख स्थान आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी पेटवून पारंपरिक गाणी व वाद्यांच्या सुरावटीवर पूजाअर्चा केली जाते. नवविवाहित जोडप्यांना वाजतगाजत आणून, होळीला नारळाची आहुती दिली जाते. या सणाच्या अनुषंगाने पुरणपोळी, विविध गोडधोडाचे पदार्थ, तर आदिवासी समाजात कैऱ्यांचा प्रसाद दिला जातो. स्वयंपाकात त्या वापरून, नातेवाईक व शेजाऱ्यांना त्याचे वाटप केले जाते. या खाद्यसंस्कृतीची ओळख व पाककलेची नव्याने भर पडत जाते. विविध वेष, सोंग घेऊन समाजबांधवांच्या घरी जाऊन पोस्त मागितला जातो.
ही रूढी परंपरा वारली पेंटिंगच्या माध्यमातून कॅनव्हासवर चितारून या सणाची खास वैशिष्ट्ये उभी केली. त्यावर शुभेच्छा संदेश लिहून, ती फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नातेवाईक व मित्रपरिवाराला पाठविले. त्याला नेटकऱ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पारंपरिक रूढी, संस्कृतीचे संवर्धन
ही रूढी परंपरा वारली पेंटिंगच्या माध्यमातून कॅनव्हासवर चितारून या सणाची खास वैशिष्ट्ये उभी केली. त्यावर शुभेच्छा संदेश लिहून, ती फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नातेवाईक व मित्रपरिवाराला पाठविले. उत्सवाच्या अनुषंगाने शुभेच्छांची देवाण-घेवाण केली. यामुळे कायद्याचे पालन, पारंपरिक रूढी, संस्कृतीचे संवर्धन आणि वारली चित्रशैलीच्या प्रचारप्रसाराचे कार्य साध्य झाले. या वैश्विक रोगाच्या पार्श्वभूमीवर असे बदल समाजाने स्वीकारणे आवश्यक असल्याचे या तंत्रस्नेही पिढीचे म्हणणे आहे.