वसई परिसरांत बेकायदा राहणाऱ्या नायजेरियनांनी घेतला काढता पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 01:32 AM2021-02-07T01:32:01+5:302021-02-07T01:32:20+5:30
पाेलीस कारवाईचा धसका : अनेकांच्या पासपाेर्टची मुदत संपली
नालासोपारा : शहरामध्ये बेकायदा नायजेरियन नागरिकांच्या वास्तव्याने गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर तुळिंज पोलिसांनी शोधमोहिम राबवून धडक कारवाई सुरू करून १४ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या कारवाईचा धसका घेत तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायजेरियन नागरिकांनी काढता पाय घेतल्याचे दिसून येत आहे.
तुळिंज पोलिसांनी ज्या परिसरात नायजेरियन नागरिक आहेत, तेथे बैठका घेऊन जागरूकता अभियानाला सुरुवात केली आहे. नालासोपाऱ्याच्या पूर्वेतील प्रगतीनगर, ९० फुटी रोड, रेहमतनगर, अलकापुरी व ओमनगर परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिक राहतात. पण, तुळिंज पोलीस ठाण्यात फक्त १९ नायजेरियनांची नोंद आहे. काही जणांचे पासपोर्ट आणि व्हिसाची मुदतही संपलेली आहे. या बेकायदा वास्तव्याविराेधात आयुक्त सदानंद दाते यांच्या आदेशानंतर पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, संजयकुमार पाटील आणि प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळिंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचा धसका घेत नायजेरियनांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे.
बैठका घेऊन जनजागृती
तुळिंज पोलीस ठाण्याची हद्द लवकरच नायजेरियनमुक्त होईल, असे राजेंद्र कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही कारवाई नेहमीच सुरू राहणार आहे. जागोजागी मोहल्ला कमिटीच्या मिटिंग घेऊन या परिसरातील नागरिकांना नायजेरियन नागरिकांना सदनिका भाड्यावर देऊ नका, असे आवाहनही केले आहे.