निरी, आय.आय.टी. अहवाल थातूर-मातूर, कारवाई नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:39 PM2019-06-19T22:39:41+5:302019-06-19T22:39:49+5:30
करोडो रुपयांचा खर्च वाया; गतवर्षीची वसई-विरार नालासोपाऱ्याची पूरस्थिती
- आशिष राणे
वसई : महानगरपालिकेने करोडो रु पये खर्च करून आय.आय.टी आणि निरीकडून महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाहणी करून सूचना मागवल्या होत्या. विशेष म्हणजे केंद्र सरकार प्राधिकृत या दोन संस्थांनी २०१९ च्या पावसाळयापूर्वी प्राथमिक स्वरुपाच्या कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या स्वरुपाचा प्राथमिक अहवाल महानगरपालिकेला दिला, परंतु या अहवालानुसार थातुरमातूर काम करण्याव्यतिरिक्त वसई-विरार महानगरपालिकेने या अहवालाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना उपशहर मिलिंद चव्हाण यांनी केला आहे.
दरम्यान चव्हाण यांच्या सांगण्यानुसार हा अहवाल येण्यापूर्वीच तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे आणि आता सध्याचे आयुक्त बी.जी.पवार यांच्याशी संपर्क साधून नालासोपारा शहराचे सांडपाणी ज्या सोपारा खाडीतून वसई शहरात येते त्या खाडीचा मार्ग बदलून तिथे खाडीत भराव टाकून मैदानाचे आरक्षण टाकले असल्याचे निदर्शनास आणून दिले. परंतु याबाबत महानगरपालिकेतर्फे आजमितीला काहीच केले गेले नाही.
विशेष म्हणजे आता प्रसिध्द झालेल्या या निरी तथा सत्यशोधन समितीच्या अहवालात पान क्र.२१ व २२ मध्ये देखील हा जो बदललेला मार्ग यंदाही पूरपरिस्थिती आमंत्रण देणारा असल्याचे नमूद केले आहे आणि २०१९ च्या पावसाळयापूर्वी तो पाणी जाण्यासाठी पूरक करावा, अशी सूचना असतांना देखील महानगरपालिका झोपेचे सोंग घेत आहे. कारण खाडीचा हा मार्ग महानगरपालिकेनेच भराव टाकून बंद केला आणि तिथे अनधिकृत मैदान कोणत्या लोकप्रतिनिधीच्या सांगण्याप्रमाणे केले हे एक कोडेच आहे. एकूणच या अशा कृत्यामुळे वसईच्या जनतेला पुन्हा पुरात ढकलले जाते आहे का नाही? ते महानगरपालिका आयुक्त सांगणार का? जनतेचा पैसा खर्च करून जो अहवाल मागवला आहे त्यावर अंमलबजावणी कधी व कशी करणार हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. किंबहुना महानगरपालिकेने शहरात गाळ काढण्याचे कामही पूर्णपणे केले नसून तो काढून तिथेच ठेऊन पुढच्या वर्षासाठी ठेकेदारांची आर्थिक सोय करून ठेवली असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे.