निंबवली आरोग्य उपकेंद्र ४ दिवसांत सुरू - मोरे

By admin | Published: July 3, 2016 02:59 AM2016-07-03T02:59:45+5:302016-07-03T02:59:45+5:30

निंबवली येथील आरोग्य उपकेंद्र उद्घाटनाच्या तांत्रिक बाबींचा विचार न करता चार दिवसात सुरू केले जाईल,अशी महत्वपूर्ण घोषणा येथे गुरूवारी झालेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात

Nimbliya health sub-center begins in 4 days - More | निंबवली आरोग्य उपकेंद्र ४ दिवसांत सुरू - मोरे

निंबवली आरोग्य उपकेंद्र ४ दिवसांत सुरू - मोरे

Next

कुडूस : निंबवली येथील आरोग्य उपकेंद्र उद्घाटनाच्या तांत्रिक बाबींचा विचार न करता चार दिवसात सुरू केले जाईल,अशी महत्वपूर्ण घोषणा येथे गुरूवारी झालेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात आमदार शांताराम मोरे यांनी केली. तसेच वाड्यातील वाहतूककोंडीवर कायमस्वरुपी इलाज करण्यासाठी बायपास किंवा उड्डाणपूल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, वाडा पंचायत समितीचे सभापती अरुण गौड, वाडा पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार पाटील, लोकमतच्या ठाणे आणि पालघर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी, पालघर जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते निलेश गंधे, जि.प.सदस्य धनश्री चौधरी, पंचायत समिती सदस्य जगन पाटील, मेघना पाटील, नायब तहसीलदार प्रकाश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विक्रमगडमध्ये रस्ते चांगले आहेत. अगदी गावपाड्याचे रस्तेही छान आहेत. मग वाड्यातील रस्त्यांची दुर्दशा का? कोंढला रस्ता इतका खराब आहे की, त्याला रस्ता म्हणायची लाज वाटावी. हा रस्ता आमदारांनी आपल्या आमदार निधीतून दुरस्त करून द्यावा, असा प्रश्न उपस्थित केला गेला असता अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेकडील अथवा पंचायत समितीकडील रस्ते दुरूस्तीचा निधी अल्प असतो. त्यामध्ये या रस्त्याची दुरूस्ती होणे अवघड आहे. त्यामुळे तो सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्त झाला तर पुरेसा निधी आणि उत्तम काम करणे शक्य होईल. याबाबत आमदारांनी तातडीने लक्ष घालण्याचे मान्य केले. रस्त्याच्या कामाला ढोबळमानाने निधी मंजूर करण्याऐवजी प्रती कि.मी. दराने निधी मंजूर व्हावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सचिन पाटील यांनी असा प्रश्न मांडला की, येथे मंजूर झालेले वीज उपकेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होत नाही. एकीकडे डी-झोन जाहीर झालेला, परंतु आहे त्या उद्योगांना वीजपुरवठा धड नाही आणि त्यामुळे नवे येऊ शकत नाही. असलेले बंद पडत आहेत. अशा स्थितीत या वीजकेंद्राचे काम कधी पूर्ण होणार? यावर ते लवकरच पूर्णत्वास जाईल असे उत्तर कनिष्ठ शाखा अभियंत्यांनी दिले.
अशोक हरीभाऊ यांनी प्रश्न मांडला की, आम्ही दिगर गावाहून ११ कि.मी. अंतर प्रवास करून वाड्याला १० मिनिटांत येतो. पण खंडेश्वरी नाका ते वाडा हे अंतर पार करण्यासाठी अर्धा तास लागतो. एक तर अतिक्रमण हटवा, पार्किंगला शिस्त लावा नाहीतर उड्डाणपूल करा नाहीतर बायपास रस्ता बांधा पण आमच्या या समस्येची तड लावा, यावर पोलीस उपनिरीक्षक संजय चौधारी यांनी सम विषम तारखेच्या पार्किंगचा तोडगा सुचवला. पीडब्ल्यूडीने रस्त्याच्या दोन्ही बाजूस पांढरे पट्टे मारून द्यावेत. त्या पलीकडे पार्किंग करणाऱ्यांवर केसेस करतो, असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात हा उपाय व्यवहार्य आणि परिणामकारक नसल्याचा कौल येताच आमदारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालून आपण फ्लायओव्हर मंजूर करून घेऊ असे सांगितले. तसेच यावेळी असे ही सांगण्यात आले की, वाडा बायपाससाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्याचा विनियोग लवकरच केला जाईल.
सुहास आकडे यांनी सांगितले की, कोणत्याही रस्त्याची निर्मिती अथवा दुरूस्ती झाल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी त्या कंत्राटात असली पाहिजे. त्यापोटी कंत्राटदाराच्या बिलातील काही रक्कम ही राखून ठेवली पाहिजे. परंतु असे घडत नाही. त्यामुळे झालेल्या कामाचा दर्जा राखण्याची कोणतीही जबाबदारी कंत्राटदारावर राहत नाही. तेव्हा याबाबत काय केले जाणार आहे? कोणतेही काम मंजूर झाल्यावर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक देखरेख समिती असली पाहिजे. ती ही नेमली जावी यावर ही बाबत धोरणात्मक असल्याने त्याचा पाठपुरवा केला जावा असे ठरले.
मिलिंद धुळे यांनी प्रश्न केला की, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १९६ बोअरींग वाडा तालुक्यात मंजूर झाल्या आहेत. यातल्या किती बोअरींग खोदल्या गेल्या? त्यांच्या कामाचे स्टॅटस काय आहे? किती ठिकाणी प्रत्यक्षात पंप बसले? त्यावर वाडा तालुका पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार पाटील यांनी सांगितले की, या विभागात एकच कर्मचारी आहे. असे असतांनाही सर्वाधिक विहिरी वाडा तालुक्यात मंजूर झाल्या आहेत. आधी पाहणी होते मग स्थान निश्चिती होते मग विहीर खोदली जाते आणि तिच्यातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन तिथे हापसा बसवायचा की नाही हे ठरते.
हे काम पावसाळ्यात करणे अवघड होते. कारण तांत्रिक बाब आणि दुसरे म्हणजे पाण्याची वर आलेली पातळी हे असते. माझ्या माहितीनुसार जवळपास ९६ विहिरी खोदल्या गेल्या असून, त्यांच्या पुढच्या कामांचीही प्रगती सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर उर्वरित विहिरीही खोदून पूर्ण केल्या जातील.
जितेश पाटील यांनी प्रश्न केला की, येथून जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन का होत नाही? यावर जि.प. सदस्य गंधे म्हणाले की, तांत्रिक कारणामुळे याचे उद्घाटन करता येत नाही. असे मंत्रालयातून सांगण्यात आले.त्यावर मंत्रालयातल्या तांत्रिकतेसाठी येथे रुग्णांचे बळी देणार का? असा प्रश्न केला गेला असता येत्या चार दिवसांत या रुग्णालयाचे उद्घाटन होईल असे ते म्हणाले.
रुग्णालयात डॉक्टर नाहीत, एक आहे ते सतत मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असतात. ही स्थिती कधी बदलणार? यावर आमदारांनी मी आरोग्य मंत्र्यांनाच भेटीसाठी घेऊन येतो आणि त्यांना सर्व परिस्थिती दाखवतो, असे सांगितले. तर जि.प.सदस्य धनश्री चौधरी म्हणाल्या की, या ठिकाणी दोन डॉक्टर आहेत त्यातले एक निलंबित असून दुसरे मद्याच्या आहारी गेले आहेत. अलीकडेच १८ नव्या डॉक्टरांची भरती झाली असून त्यातील एक डॉक्टर या केंद्रासाठी मिळेल.

Web Title: Nimbliya health sub-center begins in 4 days - More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.