मेव्हण्यानेच घातला दरोडा, जीजूचेच शिवम ज्वेलर्स लुटणारा साथीदारांसह झाला गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:10 AM2017-09-03T05:10:51+5:302017-09-03T05:11:00+5:30
दुकानात काम करीत असलेल्या मेव्हण्यानेच आपल्या चार साथीदारांसह जीजूच्या ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून ५५ लाखांचे दागिने आणि २८ हजार रुपयांची रोकड लुटल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
वसई : दुकानात काम करीत असलेल्या मेव्हण्यानेच आपल्या चार साथीदारांसह जीजूच्या ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून ५५ लाखांचे दागिने आणि २८ हजार रुपयांची रोकड लुटल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दागिने आणि रोकड जप्त केली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील सितारा बेकरीजवळ असलेल्या शिवम ज्वेलर्सवर २३ आॅगस्टला तीनच्या सुमारास दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून मालक रुपसिंग राजपूत याला दोरीने बांधून ठेवले होते. त्यानंतर ५५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २८ हजार रुपयांची रोकड लुटून नेली होती. कोणताही पुरावा मिळू नये यासाठी दरोडेखोरांनी दुकानातील सीसीटीव्ही आणि डिव्हीआर लंपास केला होता. त्यामुळे दरोडेखोरांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते.
तपास करणाºया तुळींज पोलिसांना दुकानात काम करीत असलेला रुपसिंग राजपूत यांचा मेव्हणा मानुसिंग राजपूत (३२) याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या म्हणून त्याला ताब्यात घेऊन इंगा दाखवताच त्याने दरोड्याची कबुली दिली. त्याने आपले साथीदार छगनलाल रावल (३३, रा. वापी, गुजरात), नाहर सिंग (३५, रा. उदयपूर राजस्थान) यांच्यासह नाहरच्या दोन मित्रांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली. दरोड्यात लुटलेला माल मानुसिंग याने राजस्थान येथे आपल्या बहिणीच्या घरी लपवून ठेवला होता. तोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.