निर्मळची प्रसिद्ध यात्रा यंदा रद्द, हजारो वर्षांपासूनची परंपरा होणार खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 12:53 AM2020-12-08T00:53:42+5:302020-12-08T00:54:00+5:30

Nalasopara News : वसई तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र निर्मळ येथे श्रीमद् जगदगुरू शंकराचार्यांची समाधी असून या ठिकाणी दरवर्षी होणारी यात्रा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे.

Nirmal's famous yatra canceled this year | निर्मळची प्रसिद्ध यात्रा यंदा रद्द, हजारो वर्षांपासूनची परंपरा होणार खंडित

निर्मळची प्रसिद्ध यात्रा यंदा रद्द, हजारो वर्षांपासूनची परंपरा होणार खंडित

Next

नालासोपारा : वसईतील निर्मळ येथील शंकराचार्यांचे मंदिर ऐतिहासिक आहे. येथे दरवर्षी यात्रा होते. वसई तालुका व जिल्ह्याबाहेरून यात्रेकरू मोठ्या प्रमाणात समाधी दर्शनास येतात. पण हजारो वर्षांपासून सुरू असलेली ही यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांसह यात्रेकरूंचा हिरमोड झाला आहे.

वसई तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र निर्मळ येथे श्रीमद् जगदगुरू शंकराचार्यांची समाधी असून या ठिकाणी दरवर्षी होणारी यात्रा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. नालासोपारा शहरात वर्षभरातून १५ दिवस अशा प्रकारच्या उत्‍सवाच्‍या स्‍वरूपातील जत्रा भरत असल्‍याने अनेक जण या दिवसांची वाट पाहत असतात. यंदा निर्मळचा हा यात्रौत्सव १० डिसेंबरपासून सुरू होणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून लागू करण्यात आलेल्या प्रतिबंध व उपाययोजना यांचे पालन आवश्यक असल्याने यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नियमांचे पालन करूनच समाधी स्थानाचे दर्शन घेता येणार आहे. ११ डिसेंबरला पालखी उत्सव रात्री आवश्यक शासकीय परवानगीनुसार वाहनांतून मार्गस्थ होऊन विमल सरोवराला प्रदक्षिणा करून पुन्हा मंदिरात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्यात विश्वस्त मंडळ, ट्रस्टी सामील होणार आहेत.

हजारो वर्षांपूर्वीची यात्रा यावेळी कोरोनामुळे पहिल्यांदा खंडित झाली आहे. सोशल डिस्टन्स पाळून भाविकांना मंदिरात दर्शन देणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश देणार नाही.
- पंकज चोरघे, ट्रस्टी, श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य समाधी मंदिर, निर्मळ

मंदिराच्या दोन्ही विश्वस्त मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी वसई पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दोन वेळा बैठका घेतल्यानंतर कोरोनामुळे ही यात्रा रद्द झाली आहे. तरीही मंदिरावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
- कल्याणराव कर्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे
 

Web Title: Nirmal's famous yatra canceled this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.