महिनाभरानंतरही कारवाई नाही, तहसीलदारांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:54 AM2020-03-04T00:54:15+5:302020-03-04T00:54:19+5:30
पालघर तालुक्यातील पूर्व भागात ग्रामपंचायत लालोंढे परिसरात येणाऱ्या गवळी पाडा येथील दगड खाणीतील ब्लास्टमुळे तेथील आजूबाजूच्या घरांना तडे गेले आहेत.
मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व भागात ग्रामपंचायत लालोंढे परिसरात येणाऱ्या गवळी पाडा येथील दगड खाणीतील ब्लास्टमुळे तेथील आजूबाजूच्या घरांना तडे गेले आहेत. त्याची तक्रार महसूल खात्याकडे करण्यात आली असून पालघर तहसीलदारांनी तेथे जाऊन पाहणी करून पंचनामेही केले. परंतु महिना उलटला तरी अद्याप तेथे काहीही कारवाई झालेली नाही. यामुळे नागझरी, लालोंढे परिसरातील अनेक अवैध दगड खाणी जोरात सुरू आहेत.
ग्रामपंचायत लालोंढे हद्दीत गवळी पाडाजवळील रमेश नंदगवळी यांची मालकीच्या गट क्र. २२८/४.५ जमिनीत दगड खाणीत ब्लास्ट केला जातो. त्यामुळे परिसरामध्ये हादरे बसतात. घरांना तडा गेले आहेत. या विरोधात ग्रामस्थांनी १३ एप्रिल २०१८ रोजी घेतलेल्या ग्रामसभेत ठराव केला. त्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्या अनुषंगाने पालघर तहसीलदारांनी ६ फेब्रुवारी रोजी त्या ठिकाणी जाऊन पहाणी करून पंचनामे केले, मात्र महिना होत आला तरी त्यावर काहीही कारवाई झालेली नाही.
या संदर्भात खाणमालक रमेश नंदगवली यांच्याश्ी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, माझ्याजवळ खदानीसंबंधित सर्व परवानग्या आहेत. मी रॉयल्टी पूर्ण भरतो, माझ्या खदाणीतून गाडी काटा करून बाहेर निघते. त्यावेळी आॅनलाइन त्याची एण्ट्री होते. मी कंट्रोल ब्लास्ट करतो माझ्या ब्लास्टने कोणाचेही नुकसान होत नाही.
तहसीलदार सुनील शिंदे म्हणाले की, आम्ही लालोंढे गवळीपाडा येथे भेट दिली. घरांची पहाणी केली. हा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. त्याबाबत काही सांगता येणार नाही. जिल्हाधिकाºयांकडून आदेश मिळतील तशी पुढची कारवाई केली जाईल.