"पैशांअभावी एकही रुग्ण वंचित राहणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:40 AM2019-03-04T05:40:47+5:302019-03-04T05:41:01+5:30
दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना उपचारासाठी जमीन- जुमला, दागिने विकण्याची आवश्यकता भासणार नाही.
पालघर : दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना उपचारासाठी जमीन- जुमला, दागिने विकण्याची आवश्यकता भासणार नाही. पैशाअभावी एकही रूग्ण उपचारांपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर मध्ये आयोजित अटल आरोग्य शिबिरादरम्यान व्यक्त केला.
या शिबिराचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित यांच्यासह विविध नेते, अधिकारी आदी उपस्थित होते.
मुंबईतील मोठ्या रुग्णालयातही प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेच्या कार्डामुळे मोफत उपचार होतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. खासदार गावित यांनी या शिबिरात एक लाख तीस हजार रूग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आल्याचे सांगितले. टाटा ट्रस्टने तीन हजार अंगणवाड्यांच्या नूतनीकरणासाठी देण्यात आलेल्या साहित्याचा तपशील यावेळी सुपूर्द करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी शिबिरासाठी उपस्थित असलेल्या
डॉ. अमित मायदेव, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.