लाच घेणाऱ्यांची खुर्ची कायम, निलंबनाचा मुहूर्त सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 09:47 AM2021-12-12T09:47:21+5:302021-12-12T09:47:58+5:30

लाचलुचपत विभागाचे चार वर्षांत २० सापळे : ३७ आरोपी जाळ्यात 

no suspension who took bribe thane palghar area vasai virar city | लाच घेणाऱ्यांची खुर्ची कायम, निलंबनाचा मुहूर्त सापडेना

लाच घेणाऱ्यांची खुर्ची कायम, निलंबनाचा मुहूर्त सापडेना

Next

मंगेश कराळे
नालासोपारा : ज्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले त्यांना शिक्षा होते, असा समज तुम्ही करून घेतला असेल तर तो चुकीचा आहे. ठाणे व पालघर लाचलुचपत विभागाने २०१८  ते २०२१ यादरम्यान २० सापळे रचून ३७ आरोपींना जाळ्यात पकडले. यातील काही जणांना शिक्षा झाली तर काही निर्दोष सुटले व काही जणांचे खटले अद्यापही प्रलंबित आहेत.

लाचखोरांना न्यायालयाने दोषमुक्त केल्याने ते सरकारी सेवेत उजळमाथ्याने वावरत आहेत. तर ज्या लाचखोरांवरील खटले प्रलंबित आहेत, ते सातव्या वेतनाचे लाभ घेत आहेत. पोलिसांकडून पुरेसा पाठपुरावाच होत नसल्याने हे खटले रेंगाळलेले आहेत. त्यामुळे लाच घेताना पकडले, की सहा महिने निम्मा व त्यानंतर पूर्ण पगारासह मजेत नोकरी करा, अशी परिस्थिती आहे. कायदा व शासकीय सेवा नियमन कायद्यान्वये कोर्टात तारीख पे तारीख अन् कर्मचारी पुन्हा लाच घ्यायला मोकळे, अशी परिस्थिती आहे.

लाचखोरीत महानगरपालिका नंबर वन 

  • लाचलुचपत प्रतिबंध विभागाची सर्वात जास्त कारवाई वसई-विरार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागासह अन्य विभागात केली आहे. 
  • अतिक्रमण विभागाचे ५ तर ३ लिपिक असे आठ जणांसह १ नगररचना विभागाचा तत्कालीन नगररचना अधिकारी, १ नगररचना लिपिक, १ अग्निशामक अधिकारी असे ११ आरोपींवर केली आहे.
  • महावितरणच्या दोघांवर तर ९ लाचखोर पोलिसांना पकडले आहे. वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला पळून जात असताना एसीबीने पकडल्यावर ते प्रकरणही चांगलेच गाजले.
     

चार वर्षांची एकूण आकडेवारी
१३ मनपा, ९ पोलीस, २ महावितरण, २ वनविभाग, २ महसूल, खासगी इसम, १ विस्तार अधिकारी, १ ग्रामसेवक, २ मुख्याध्यापक, २ वैद्यकीय विभाग, १ राज्य कर अधिकारी, १ अंगणवाडी सेविका, १ कनिष्ठ लिपिक

सरकारी कर्मचाऱ्याने कोणत्याही कामासाठी लाच घेऊ किंवा मागू नये. लाचेची कोणी मागणी करत असेल तर पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. त्याची पडताळणी करूनच संबंधित सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल. दरवर्षी याकरिता विभागाकडून जनजागृती करण्यात येते. घोटाळा, भ्रष्टाचार होत असल्यास जागरूक नागरिकांनी तक्रार करण्यास पुढे येणे गरजेचे आहे. 
नवनाथ जगताप, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर

कोणी लाच मागितली तर साधा संपर्क
भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधा. ई मेल dypacbpalghar@gmail.com, टोल फ्री नंबर - १०६४, दूरध्वनी क्रमांक - ०२५२५-२९७२९७ आणि व्हॉट्सअप क्रमांक - ९९२३३४६८१०, ८००७२९०९४४

Web Title: no suspension who took bribe thane palghar area vasai virar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.