ना. तहसीलदार दहावी नापास?, बोगस दाखला सोशल मिडीयावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:58 AM2019-01-21T00:58:19+5:302019-01-21T00:58:28+5:30
वसई तहसीलदार कार्यालय येथील नवनियुक्त नायब तहसीलदार हे दहावी नापास असल्याचा पुरावा समोर आला आहे.
वसई : वसई तहसीलदार कार्यालय येथील नवनियुक्त नायब तहसीलदार हे दहावी नापास असल्याचा पुरावा समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच दाखल्यावरील नंबरचा वापर करून त्यांनी सेवापुस्तिकेत दहावी उत्तीर्ण असल्याचे दाखवून नोकरी मिळवली आहे. सध्या नायब तहसीलदारपदासोबत पुरवठा निरीक्षक हे पदही त्यांच्याकडे आहे.
रेशन कार्डावर नोंदवलेल्या बोगस लाभ धारकांना हुडकून काढल्याचा दावा करत आपली पाठ थोपटून घेणारे वसईचे नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक प्रदिप दामोदर मुकणे यांनी मात्र स्वत:च नोकरी मिळविण्यासाठी बोगस दस्तऐवज वापरून गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.जव्हार मधील के.व्ही.हायस्कूल येथून सन 1988 च्या मार्च शालान्त परिक्षेत मुकणे नापास झाल्याचा शेरा शाळेने मारला आहे. या शाळेने दिलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात खाडाखोड करून त्यांनी पुढे आपण पास असल्याचे दाखवून लिपीक पदासाठी अर्ज करून नोकरी मिळवली. शाळा सोडल्याचा दाखला क्र.4638च्या निरीक्षणाअंती हि धक्कादायक बाब समोर आली आहे. मुकणे यांनी प्रशासन तसेच नागरिकांचीही दिशाभूल करून हा गुन्हा केला आहे. त्यामूळे त्यांना त्वरीत सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशा मागणीचे पत्र पुराव्यासह प्रांत अधिकारी दिपक क्षीरसागर यांना जागृत नागरिकांकडून सादर करण्यात आलेले आहे. तहसिलदार किरण सुरवसे यांनी याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगून कार्यालयात त्यांनी कोणते कागदपत्रे सादर केलेले आहेत याची माहिती घ्यावी लागेल असे सांगून अधिक माहिती देणे टाळले.
परंतु आता जिल्हाधिकारी याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तर मुकणे यांचा मोबाईल ते नॉट रिचेबल असल्याचा मॅसेज गेले काही दिवस देत आहे.
>अशी आहे या प्रकरणाची वस्तुस्थिती
मागील 30 वर्षापासून सदर दहावी नापास अधिकारी नियमबाह्यरित्या एकाच विभागात एकाच कार्यालयात पदावर कार्यरत आहे. आधीच पुरवठा विभागातील गैरव्यवहाराबद्दल मुकणे यांचे नाव चर्चेत आहे.मात्र त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई झालेली नाही.कोकण आयुक्तांकडे चौकशी तसेच अहवालाची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी दिपक गुठे यांच्याकडे करण्यात आली असताना हे नवीन प्रकरण समोर आले आहे. वसईचे नायब तहसीलदार दहावी नापास हाच मुद्दा आता येत्या हिवाळी अधिवेशनात गाजण्याचे संकेत दिसत आहेत.याबाबत मुकणे यांची प्रतिक्रि या घेण्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही तसेच ते कार्यालयातही हजर नसल्यामुळे याबाबत ते काय स्पष्टीकरण देऊ इच्छित आहे ते कळू शकले नाही.