ना शौचालय, ना कपडे बदलण्याची व्यवस्था; खेळाडूंची होते गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 10:41 PM2020-02-23T22:41:58+5:302020-02-23T22:42:22+5:30
ऐतिहासिक रणवीर चिमाजी आप्पा मैदानाची व्यथा
वसई : वसईच्या रणवीर चिमाजी आप्पा मैदानात शौचालय तथा कपडे बदलण्याची पक्की व्यवस्था नसल्याने खेळाडूंना अनेक गैरसोर्इंना तोंड द्यावे लागते आहे. विशेष म्हणजे ‘चेंजिग रूम’ उभारण्याच्या कामासाठी आतापर्यंत दोन ते तीन वेळा स्थानिक आमदारांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींमधून खंत व्यक्त होत आहे.
सविस्तर माहितीनुसार, वसई गावात रणवीर चिमाजी आप्पा हे भव्य मैदान असून या मैदानात क्रि केटसह अनेक खेळांच्या स्पर्धा नित्यनियमाने भरतात. वसईचा भव्य कला-क्रीडा महोत्सव याच मैदानात भरतो तर याच काळात हे मैदान खेळाडूंसह सर्वसामान्यांच्या गर्दीने अक्षरश: फुलून जाते. २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांचे संचलनही येथेच होते. पावसाळ्याचा काही काळ वगळता, वर्षभर या मैदानाचा वापर फिरण्यासाठी होतो. मात्र, या मैदानात अद्यापही सुसज्ज असे शौचालय आणि चेंजिंग रूम नसल्याने खेळाडूंसह सर्वसामान्य नागरिकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते आहे. अनेकजण या मैदानातच उघड्यावर नैसर्गिक विधी उरकत असल्याने मैदानाच्या काही भागात दुर्गंधी निर्माण होते. महापालिकेने मैदानाच्या बाहेर ठेका पद्धतीने शौचालये ठेवली आहेत. मात्र, मैदानात शौचालयाची व्यवस्था नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
खेळाडुंना कपडे बदलण्यासाठी मैदानात कोणत्याही प्रकारची पक्की व्यवस्था नाही. आ. हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते खेळाडूंसाठी छोट्या रूम बांधण्याच्या कामाचे दोन-तीनदा उद्घाटन झाले. अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. मैदानात एकावेळी अनेकांना वापरता येईल, असे सुसज्ज शौचालय आणि खेळाडुंसाठी चेंजिंग रुमची व्यवस्था करण्याची मागणी जनता दलाचे वसई शहर अध्यक्ष व्हॅलेरियन घोन्सालवीस यांनी केली आहे.
निधी मंजूर असूनही होते गैरसोय
व्हॅलेरियन गोन्सालवीस म्हणाले की, :महापालिका मैदानाच्या बाहेर ठेका पद्धतीने शौचालये ठेवू शकते. मात्र, मैदानात शौचालयाची कायमस्वरुपी व्यवस्था करत नाही, याचे आश्चर्य वाटते. प्रशासनाने खेळाडू आणि सर्वसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन येथे चेंजिंग रूम तयार करावी.’
वसई-विरार मनपाच्या ‘आय’ प्रभाग समिती कार्यालयात संपर्क साधला असता, मैदानाबाहेर शौचालय व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले. खेळाडुंना चेंजिंग रूम देण्यासाठी पालिकेकडे निधी मंजूर आहे. मात्र, ही व्यवस्था मैदानाच्या कोणत्या बाजूला करावी, याबाबत चर्चा सुरू आहे.