नोटाबंदीने रिसॉर्ट, पर्यटन व्यवसायात मंदी
By admin | Published: December 31, 2016 03:56 AM2016-12-31T03:56:53+5:302016-12-31T03:56:53+5:30
नोटाबंदीची पन्नास दिवसांची मुदत पूर्ण झाली तरी नवीन नोटांची टंचाई कायम असल्याचा परिणाम ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर झाला आहे.
- अनिरुद्ध पाटील, बोर्डी
नोटाबंदीची पन्नास दिवसांची मुदत पूर्ण झाली तरी नवीन नोटांची टंचाई कायम असल्याचा परिणाम ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर झाला आहे. डहाणू आणि बोर्डी या पर्यटनस्थळी पर्यटकांची संख्या कमालीची रोडावल्याने पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे.
नोटाबंदीनंतर बँकांतून पुरेशी रक्कम काढता येत नाही, तर एटीएम मधूनही केवळ दोनहजार रूपये निघतात. त्यापैकी बहुसंख्य एटीएम बंद असल्याने नागरिकांकडे पुरेसे पैसे नाहीत. डहाणू आणि बोर्डी ही समुद्र पर्यटन स्थळे ग्रामीण भागात आहेत. येथे इंटरनेट सेवेचा बोजवार उडालेला असतो. विस्कळीत सेवेमुळे कॅशलेस व्यवहारांवर मर्यादा आलेली आहे. या सर्वांचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झालेला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गत वर्षीच्या तुलनेत हॉटेल बुकिंग ३० ते ४० टक्के कमी झाल्याचे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान या वर्षीचे हे सेलिब्रेशन विकेंडला आल्याने कदाचित पर्यटक ऐनवेळी दाखल होण्याची आशा काही व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी समुद्रातील विविध प्रकारचे मासे, गावठी कोंबडी तसेच शाकाहारी खवयांसाठी हंगामानुसार स्थानिक भाजीपाला, चिकूचे प्रक्रिया केलेले पदार्थ आदींची बेगमी केलेली आहे. डहाणू शहरातील हॉटेल्स वगळता बोर्डी परिसरात शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांनी विविध योजने अंतर्गत कृषी पर्यटन केंद्र उघडलेली आहेत. येथे मद्य विक्र ी केली जात नाही. गुजरातेत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली शिवाय दमण व सिल्व्हासा येथे मद्य खरेदी कॅशलेस पद्धतीने केली जाते त्यामुळे दमणच्या दारूची टंचाई झाल्याने पर्यटकांची कोंडी झाली आहे. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे पर्यटन व्यवसायावर मंदीचे सावट पसरले आहे. समुद्रकिनारी उंट सफारीचा व्यवसाय करणारे, रिक्षा चालक आणि स्थानिक विक्रेत्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे.
खाजगी इंटरनेट सुविधा तसेच ३१ डिसेंबेरच्या सेलिब्रेशनसाठी थीमवर आधारित विविध खेळ, प्लॅस्टीक करन्सीचे पर्याय उपलब्ध केले आहेत. या उपाययोजनेमुळे गुजरात तसेच मुंबई, नाशिक या पर्यटकांनी काहीसा प्रतिसाद दिला आहे.
- श्रीकांत सावे (हिलझील, हॉटेलचे मालक)
‘‘ग्रामीण भागात कॅशलेस व्यवहारवरील मर्यादा तसेच वर्षाअखेरीस दोनहजारच्या नोटा बंदीची बातमी पसरल्याने पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली आहे.’’
- प्रशांत पाटील (मैत्री पार्क हॉटेलचे मालक)