वसईत भाजी मार्केटमध्ये बसू देत नसल्याचा राग; विक्रेत्यांनी भाज्या रस्त्यावर फेकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 08:39 PM2020-03-29T20:39:38+5:302020-03-29T20:40:04+5:30
वसई स्टेशनच्या अंबाडी रोड मार्केट परिसरातील धक्कादायक प्रकार
वसई : वसई विरार महापालिका प्रशासनाने मार्केट परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये व गर्दी टाळण्यासाठी उपाय म्हणून खुल्या मैदानात बसावे, अथवा विविध वार्डात जाऊन भाजी विक्री करावी, असे दोन खुले पर्याय दिले आहेत. मात्र, नेहमीच्याच ठिकाणी भाजी मार्केट सुरू करण्यात आल्याने पालिकेने कारवाई केल्याच्या रागातून काही मुजोर भाजी विक्रेत्यांनी भाज्यांच रस्त्यावर फेकून विरोध दर्शविला आहे.
वाढती गर्दी व संसर्ग होऊ नये यासाठी वसई स्टेशनच्या अंबाडी रोडवरील भाजी मार्केट पालिकेच्या मदतीने माणिकपूर पोलिसांनी मागील आठ दिवसांपासून बंद केले आहे. मात्र, तरी देखील काही विक्रेते लपून छपुन भाजी विक्री करीत आहेत. सरकारच्या आवाहनानुसार शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या भाजी विक्रेत्यांना पालिकेने दोन पर्याय दिले होते. यामध्ये भाजी विक्रेत्यांनी प्रभाग व वार्डात आणि गल्लोगल्ली जाऊन भाजी विकण्याचा पर्याय सुरुवातीला देण्यात आला होता
मात्र पालिकेच्या या निर्णयाला भाजी विक्रेत्यांनी सपशेल नकार दिला. तर यावर दुसरा पर्याय म्हणून या भाजी विक्रेत्यांना माणिकपूर च्या खाजगी मैदानात जागा उपलब्ध करून दिली होती. पालिकेने तिथे सोशल डिस्टनसिंग म्हणून मार्किंग देखील करून दिले होते. मात्र, तिथे ही हे भाजी विक्रेते जाण्यास तयार नाहीत.
दरम्यान, रविवारी पुन्हा ईथे भाजी मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न काही अडेल व मुजोर विक्रेत्यांनी केला असता यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमण विभाग अधिकाऱ्याशी हुज्जत घालून त्यांची अडवणूक करण्यात आली.
परिणामी महापालिकेने माल जप्त करण्यास सुरुवात केल्यावर संतापलेल्या भाजी विक्रेत्यांनी आपल्या विक्रीसाठी आणलेल्या भाज्या चक्क मुख्य रस्त्यावर फेकून दिल्याचा प्रकार या ठिकाणी दुपारी पहावयास मिळाला असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
...तरीही भाजी विक्रेत्यांना नफा दिसतो आहे ?
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव व संकट देशात व राज्यात वाढत असताना आणि खास करून वसईत ही पाच रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ना आवाहन करते आहे अशी परिस्थिती असताना वर्षानुवर्षे वसईत येऊन धंदे करणारे हे मुजोर भाजी विक्रेते केवळ नफा म्हणून पैसे कमवण आणि पार मनमानी करत असल्याचं या घटनेनंतर समोर आलं आहे.
"आम्ही या भाजी विक्रेते यांना दोन्ही पर्याय दिले त्यासाठी चार चार वेळा बैठका घेतल्या मात्र दोन्हीही पर्याय या भाजी विक्रेत्या ना मान्य नाहीत, याउलट कारवाई वेळी यातील काहींनी भाज्या चक्क रस्त्यावर फेकून विरोध दर्शविला तर याचे व्हिडीओ देखील आमच्याकडे आहेत, चौकशी सुरू असून गरज पडल्यास पोलिसांकडे गुन्हे ही नोंद करू"
- गिलसन घोनसालवीस
सहायक आयुक्त, प्रभाग "एच "समिती