महापालिकेच्या लेखापरीक्षणावर ताशेरे, स्थानिक लेखापरीक्षकांना सादर केलेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 03:55 AM2017-08-22T03:55:49+5:302017-08-22T03:55:53+5:30
वसई विरार महापालिकेने स्थानिक निधी लेखापरिक्षकांना प्रमाणित लेखे सादर केले नाहीत. असे ताशेरे मारून पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अहवालात कॅगने नाराजी व्यक्त केली आहे.
वसई : वसई विरार महापालिकेने स्थानिक निधी लेखापरिक्षकांना प्रमाणित लेखे सादर केले नाहीत. असे ताशेरे मारून पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अहवालात कॅगने नाराजी व्यक्त केली आहे.
भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांच्या अहवालानुसार स्थानिक निधी लेखा परिक्षकांनी वर्ष २०१४-१५ पर्यंतचे वसई विरार महापालिकेचे लेखापरिक्षण पूर्ण केलेले आहे. मात्र, महापालिकेमार्फत आवश्यक प्रमाणित लेख्यांची पूर्तता होत नसल्याकारणाने अद्यापही लेखा परिक्षण अहवाल प्रलंबित असल्याचे कॅगच्या अहवालामधून उजेडात आले आहे. त्याचप्रमाणे भारताचे लेखापरिक्षक व नियंत्रक यांनीही या प्रकाराबाबत संबंधित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.
शासकीय बनावट दस्तऐवज तयार करून त्याद्वारे उभी राहिलेली बेकायदेशीर बांधकामे, टँकर घोटाळा, ट्रीगार्ड घोटाळा, तलाव लिलावात गैरव्यवहार, महापालिका क्षेत्रातील बांधकामात अनियमितता, प्राधिकृत अधिकाºयांच्या सहीशिवाय कामांना मंजुरी देणे, बांधकामांच्या फाईली उपलब्ध नसणे, शासनाचा गौण खनिजासंबंधीचा महसूल बुडविणे, कर्मचाºयांच्या भविष्य निर्वाह निधीत रकमा भरण्यातील अनियमितता, बेकायदेशीर खदाणी, बेकायदेशीर वाळू उत्खनन या व अशा अनेक गैरव्यवहारांचा समावेश आहे. यातील काही गैरव्यवहारांबाबत खुद्द महापालिकेच्याच अंतर्गत लेखापरिक्षकांनी आक्षेप घेतलेले आहेत.
या गैरव्यवहारांसोबतच महापालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून प्रमाणित लेखे सादर करण्यात जाणिवपूर्वक दिरंगाई केली जात असून भ्रष्ट कारभाराला प्रोत्साहन देण्याचे काम प्रशासन करीत असल्याची तक्रार नगरसेवक धनंजय गावडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
गावडेंची सरकारकडे मागणी
महापालिकेने तात्काळ संबंधित दस्तऐवज अथवा प्रमाणिक लेखे स्थानिक निधी लेखा परिक्षकांना उपलब्ध करून द्यावेत. याप्रकरणी दिरंगाई करणाºया संबंधित अधिकाºयांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.