धोकादायक इमारतींना नोेटिसा; ५०० पेक्षा जास्त इमारती कोसळण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 01:48 AM2020-05-29T01:48:21+5:302020-05-29T01:48:28+5:30
पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल दरवर्षी तयार करते.
नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी महानगरपालिकेने ५८७ इमारती धोकादायक घोषित करून त्यांना नोटिसा धाडल्या होत्या. तर १९८ इमारतींना अतिधोकादायक म्हणून घोषित केले. त्यापैकी काही इमारती तोडण्यात आल्या, पण काही धोकादायक इमारती अद्याप उभ्या असून त्या कधीही पडण्याच्या तयारीत आहे. महानगरपालिकेने प्रभागांतर्गत अशा इमारतींना नोटिसा देण्याचे काम सुरू केलेले आहे.
पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल दरवर्षी तयार करते. त्यानुसार धोकादायक इमारतींची वर्गवारी होते. ज्या अतिधोकादायक इमारती असतात, त्या तात्काळ रिकाम्या करायच्या असतात. मात्र, महानगरपालिकेकडे सध्या संक्रमण शिबीर नसल्याने अद्याप एकाही अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढून त्यांचे अन्यत्र पुनर्वसन केले नसल्याचे सूत्रांकडून कळते.
...तर पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती
च्नालासोपारा पूर्वेकडील विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. नालासोपारामध्ये धोकादायक इमारतींचा काही भाग कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहे.
च्येथील टाकी रोड, ओसवाल नगरी, विजयनगर, साईनाथनगर, आत्मवल्लभ सोसायटी, कपोलनगर, संखेश्वरनगर, आचोले रोड या विभागात अनेक धोकादायक इमारती आहेत. याबाबत वेळीच कार्यवाही झाली नाही तर पावसाळ्यात मोठी दुर्घटना होऊन काही
जीवितहानी घडू शकते.
वसई तालुक्यात ५६० पेक्षा जास्त धोकादायक इमारती आहेत. या इमारतींना वेळोवेळी नोटिसा पाठवत असतो. येथील रहिवाशांनी त्यानुसार इमारतीची डागडुजी, मजबुतीकरण करून घ्यायचे असते. इमारत अतिधोकादायक असेल तर रहिवाशांनी ती स्वत:हून रिकामी करायची असते. मनपाची नोटीस मिळूनही लोक त्याकडे कानाडोळा करतात.
- रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका