सर्वसामान्यांच्या मुलांना सुद्धा शिकता येणार CBSE बोर्डाच्या शाळेत; मीरा भाईंदर महापालिकेने मागवले प्रस्ताव
By धीरज परब | Published: November 30, 2023 07:00 PM2023-11-30T19:00:56+5:302023-11-30T19:01:44+5:30
मीरा भाईंदर महापालिकेने सीबीएसई बोर्डाची शाळा चालवण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने सीबीएसई बोर्डाची शाळा चालवण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. शाळेची ५ मजली इमारत तयार असून महापालिकेची सीबीएसई बोर्डची शाळा पुढील वर्षापासून सुरु होणार असून सामान्य व गरीब घरातील मुलांना सुद्धा आता सीबीएसई बोर्डाच्या शाळेत शिकता येणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक येथे आरक्षण क्रमांक ११५ मध्ये विकासकाकडून विकास हक्क प्रमाणपत्राच्या मोबदल्यात तळ अधिक ५ मजल्याची शाळा इमारत बांधून मिळाली आहे . सर्व सामान्य घरातील कष्टकरी गरजू विद्यार्थ्यांना आधुनिक दर्जेदार इंग्रजी भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी त्याठिकाणी सीबीएसई बोर्डची शाळा सुरु करण्याची मागणी आ. सरनाईक यांनी चालवली होती . त्यासाठी शिक्षण मंत्री व महापालिके कडे पाठपुरावा चालवला होता.
महापालिकेने २९ नोव्हेम्बर रोजी सीबीएसई बोर्डची शाळा पुढील २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सुरु व्हावी यासाठी नोंदणीकृत व अनुभवी शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. महापालिका ही शाळा चालविण्यासाठी शाळा इमारत , वीज व पाणी पुरवठा करेल. तर सर्व शिक्षक व व्यवस्थापनाचा खर्च , शाळेसाठी आवश्यक सर्व सुविधा तयार करणे, फर्निचर , डिजिटल बोर्ड , लॅब आणि सर्व आवश्यक सुविधा या संस्थेने करायच्या आहेत. इच्छुक शैक्षणिक संस्थांनी महापालिकेकडे स्वारस्य प्रस्ताव १४ डिसेंबर पर्यंत पाठवायचे आहेत. नवी मुंबई महापालिकेची सीबीएसई बोर्डची शाळा चालविणारी संस्था भाईंदरची सदर शाळा इमारत पाहून गेली आहे. शाळा चालवायला घेईल ती संस्था दर्जेदार शिक्षण देणारी आणि सामाजिक भान जपणारी जवी अशी अपेक्षा यावेळी आ. सरनाईक यांनी बोलून दाखवली.