आता भक्तांना माघी गणेश जयंतीचे वेध, यंदा मूर्तींच्या संख्येत होणार वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 01:29 AM2021-02-01T01:29:06+5:302021-02-01T07:18:58+5:30
Maghi Ganesh Jayanti : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा उत्सव भक्तांना मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता.
बोर्डी : डहाणू फोर्ट येथील रंगशाळेत बाप्पांच्या मूर्ती निर्मितीच्या कामाची लगबग युद्धपातळीवर सुरू झाली आहे. सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील गणेश जयंती असल्याने, भक्तांकडून मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याने यंदा मूर्तींच्या संख्येत वाढ झाल्याचे मूर्ती व्यावसायिकांनी सांगितले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा उत्सव भक्तांना मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मज्जाव असल्याने सार्वजनिक उत्सव साजरा करण्यास बंधने, मूर्तीच्या उंचीचे बंधन, मिरवणूक काढण्यास मनाई तसेच मूर्ती विसर्जनावेळी केवळ दोनच व्यक्तींना सूट इ. राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागले. तर सामाजिक जबाबदारी ओळखून अनेक घरगुती व सार्वजनिक मंडळांनी उत्सव साजरा केला नाही. एकूणच गणेशभक्त भावनिकदृष्ट्या दुखावला गेला होता.
दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या माघी गणेश जयंतीकरिता भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असून त्यांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. भाद्रपदातील गणेश चतुर्थीपेक्षा माघी गणेश साजरा करण्याचे प्रमाण मागील काही वर्षात खूपच कमी होते. मात्र कोरोनामुळे उत्सवावर विरजण पडल्यानंतर, यंदाच्या माघी उत्सवासाठी मूर्तींची संख्या पन्नास टक्क्यांनी वाढल्याची माहिती डहाणू फोर्ट येथील मूर्ती व्यावसायिक केतन राणा यांनी दिली.
मूर्तिशाळांत उत्साह
कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे लाॅकडाऊन काळात सर्वच उत्सव बंद होते. गणेशमूर्तींच्या संख्येतील घट आणि उंचीचे बंधन यामुळे मूर्तींचे प्रमाण कमी होऊन व्यवसायाला मंदीची झळ पोहोचली होती. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मूर्तींची संख्या वाढली असून हाताला काम मिळाल्याने मूर्ती शाळेत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. डहाणू फोर्ट येथे ८ ते १० मूर्तीशाळा असून मूर्तींचे आकार, रंगकाम इ. लगबग दिसून येत आहे.