आता एमएमआरडीएची सुनावणी तालुकानिहाय
By admin | Published: June 20, 2017 06:34 AM2017-06-20T06:34:34+5:302017-06-20T06:34:34+5:30
एमएमआरडीएने शनिवारी दोन हजार आक्षेपकर्त्यांना एकाच वेळी वांद्रे येथील कार्यालयात बोलावून व त्यांची चार तास रखडपट्टी करून सुनावणी घेतलीच नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : एमएमआरडीएने शनिवारी दोन हजार आक्षेपकर्त्यांना एकाच वेळी वांद्रे येथील कार्यालयात बोलावून व त्यांची चार तास रखडपट्टी करून सुनावणी घेतलीच नाही. त्यामुळे ती तालुकानिहाय घेण्यात यावी असे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात प्रसिध्द करताच एमएमआरडीएला जाग आली असून त्याने आता प्रारुप आराखड्याविरोधातील सुनावणी आता तालुका स्तरावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुनावणी गावागावात घेतली न गेल्यास उपोषण करण्याचा इशारा पर्यावरण संवर्धन समितीने दिला होता.
एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्याविरोधात वसई विरारसह रायगड आणि ठाणे जिल्हयातून ६३ हजारांहून अधिक हरकती नोंदवण्या आल्याआहेत. एकट्या वसई तालुक्यातून चाळीस हजारांहून अधिक हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. यावर एमएमआरडीएने सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एकाच वेळी दोन हजार गावकऱ्यांना सुनावणीसाठी वांद्रे येथे बोलावून चार तास ताटकळत ठेवण्यात आले होते. याप्रकरणी सोमवारच्या अंकात लोकमतने आवाज उठवला होता.
ज्येष्ठ नगर रचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी एमएमआरडीएचे आयुक्त मदान यांची भेट घेऊन सुनावणी गावागावात घेण्यात यावी अशी मागणी केली होती.