आता मिळणार पुनर्वापरयोग्य सॅनिटरी नॅपकिन; शिक्षक सेनेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:12 AM2019-12-13T01:12:46+5:302019-12-13T01:13:06+5:30
आठ तालुक्यांतील ६१९ शाळांमधील विद्यार्थिनींचा समावेश
डहाणू: पालघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आठ तालुक्यांतील ६१९ शाळांमधील ३५ हजार ३६९ विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी आणि पुनर्वापर करता येणारे सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध केले जाणार आहेत. शिक्षक सेनेच्या माध्यमातून उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचा अभाव जाणवतो. मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी आणि सुरू झाल्यानंतर योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने मुली याबाबत उदासीन असतात. बहुतांश विद्यार्थिनी मासिक पाळीमुळे शालेय वर्षातील सुमारे ५० ते ६० दिवस अनुपस्थित राहतात.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बहुसंख्य विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनबाबत माहिती असली, तरी आर्थिक बाबतीत या गोष्टी परवडणाऱ्या नसल्याने त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे या समस्येवर मार्ग काढण्यासाठी शिक्षक सेना पुढे सरसावली आहे. याअंतर्गत विद्यार्थिनींना आरोग्य सल्ला दिला जाणार आहे. त्यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेसह आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी, पॅड वापरण्यासाठी जनजागृती आदी मार्गदर्शन स्त्री - रोग तज्ज्ञांकडून केले जाणार आहे. तसेच वर्षभरासाठी या नॅपकिनचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे.
शिक्षक सेना पॅडमनच्या भूमिकेत : प्रशासकीय परवानगीसाठी पत्र
सॅनिटरी नॅपकिन या विषयाचे महत्त्व आणि वापर याबाबत पॅडमॅन या सिनेमात जनजागृती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना हे नॅपकिन वापराचे महत्त्व समजावून देऊन, ते विनामूल्य उपलब्ध करणे आणि वापरासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षक सेनेने पुढाकार घेत पॅडमॅनची भूमिका वठवली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापती निलेश गंधे, माजी शिक्षण सभापती सचिन पाटील यांनी या मोहिमेत विशेष लक्ष घातले आहे. सर्व शाळांमध्ये उपक्रम राबविण्याकरिता प्रशासकीय बाबीची परवानगी मिळविण्यात शिक्षणाधिकारी सानप यांनीही परवानगी पत्र दिले आहे.
या सॅनिटरी नॅपिकनचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे कॉटनच्या कापडापासून बनवलेले असल्याने वापरानंतर स्वच्छ धुवून, सुकवून वर्षभर वापरणे सहज शक्य आहे. ते पूर्णपणे प्लास्टिकमुक्त आहे. ग्रामीण व शहरी भागातील किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबद्दल योग्य ते मार्गदर्शन मिळून शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा होईल व आर्थिक बचतही होईल.
- अॅड. डी.आर. लोंढे, अध्यक्ष, उत्कर्ष ग्लोबल फौंडेशन
आदिवासी भागात नेहमीच दुर्लक्षित असलेला मात्र किशोरवयीन विद्यार्थिनींच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा उपक्रम शिक्षक सेनेच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
- विठ्ठल ठाणगे, अध्यक्ष,शिक्षक सेना डहाणू