कामगारांनीच आता एसटी वाचविण्याच्या लढ्याला बळ द्यावे - विवेक पंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:24 PM2019-06-03T23:24:00+5:302019-06-03T23:24:05+5:30
तोट्यात जाण्यास सरकार जबाबदार : वसई आगारात एस टी चा ७१ वा वर्धापन दिन संपन्न
वसई : जोपर्यंत महाराष्ट्रात गोरगरीब जनता आहे, तोपर्यंत एसटीची बससेवा चालू राहिल कारण की, ती राज्याची जीवनवाहिनी आहे. एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी चालते, नफा कमावणे हा उद्देश्य नव्हता. मात्र एसटी महामंडळ तोट्यात जाण्याला सरकारची काही धोरणेच जबाबदार आहेत. अशी टिका विवेक पंडीत यांनी केली.
एसटी तर्फे ज्या वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात त्याचा परतावा शासनाकडून मिळत नसल्याने व कंत्राटदार धार्जिण्या धोरणामुळे एस टी तोट्यात गेली असल्याचे उद्गार राज्य आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष माजी आम. विवेक पंडित ह्यांनी शनिवारी वसई येथे एस टी कामगार संघटनेतर्फे आयोजित एसटी च्या ७१ व्या वर्धापनिदन सोहळ्यात बोलताना काढले.
यावेळी पंडित यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्याबद्दल कविवर्य सायमन मार्टिन व भरत पेंढारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पंडित यांनी विवेचन करतांना सांगितले की, सामान्य माणसाला जगायचे असेल तर खाजगीकरणाविरोधात पेटून उठलेच पाहिजे. एसटी राज्याच्या कानाकोपऱ्यात जात असते. म्हणून कामगारांनीच जनतेचं प्रबोधन करु न एस टी वाचवण्याच्या लढ्याला बळ द्यावे.
तसेच सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर बोलतांना कामगार नेते भरत पेंढारी म्हणाले की, कामगारांना उध्वस्त करुन कुठलेही राज्य प्रगति करू शकत नाही, कष्टकरीच देश घडवत असतात. मात्र दुर्दैवाने सध्याची सरकारी धोरणं कामगार विरोधीच असल्यामुळे सर्वत्र अस्वस्थता आहे.
यावेळी जन आंदोलनाच्या नेत्या कु,डॉमनिका डाबरे, कवी मार्टिन ,भाजपचे दत्ता नर एसटी महामंडळाचे दिलीप मोरे आदींची समयोचित भाषणे झाली. यावेळी सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला.