वसई-विरार महापालिका हद्दीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 01:40 AM2021-02-08T01:40:05+5:302021-02-08T01:40:30+5:30
दोन वर्षांत आढळले फक्त १६ रुग्ण; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साफसफाई अन् घेतलेली काळजी परिणामकारक
- मंगेश कराळे
नालासोपारा : वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत २०१९ आणि २०२० या दोन वर्षांच्या काळात फक्त १६ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. २०१७ मध्ये ७५ आणि २०१८ मध्ये ३३ रुग्ण आढळले होते. याचाच अर्थ गेल्या दोन वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. २०२० मध्ये तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साफसफाई आणि घेतलेली काळजी यामुळे ही रुग्णसंख्या कमी झाली असल्याचे बोलले जात आहे.
डेंग्यू या जीवघेण्या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मनपाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० साली कोरोना महामारीमुळे सर्व प्रभागात साफसफाईवर विशेष लक्ष दिले होते. तसेच सामान्य नागरिकांमध्येही कोरोनाबाबत जागरूक होते.
लोकांच्या सतर्कतेमुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये कमतरता आली आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी एप्रिल महिन्यापासून कायमस्वरूपी सुरू आहे. मनपाकडून दरवर्षी डेंग्यूबाबत घरोघरी जाऊन सर्व्हे केला जातो. तसेच घरांची तपासणीसुद्धा केली जाते.
डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. उदा. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागे दुखणे इ. रक्तस्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. याची लक्षणे साध्या डेंग्यू तापासारखी असतात व क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. नाकातून, हिरड्यातून व गुदद्वारातून रक्तस्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.
- डॉ. संदीप सरताळे, नालासोपारा
कोरोना काळात मनपाकडून संतोष भवन, झोपडपट्टी परिसरात औषध फवारणी आणि धूरफवारणी नेहमी केली जात होती व अद्यापही सुरू आहे. तसेच नाल्यांमध्ये, गटारांमध्ये कीटकनाशके फवारणी करण्यात येत आहे.
- मनोज पांडे, स्थानिक रहिवासी, नालासोपारा
मनपा डेंग्यूच्या रुग्णांबाबत खरे आकडे लपवत असून खोटे आकडे सांगितले जात आहेत. खासगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
- जीतूभाई पटेल, समाजसेवक, नालासोपारा