वसई पंचायत समितीत ओबीसी महिलेला सभापतीपदाचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:22 PM2020-02-01T23:22:29+5:302020-02-01T23:23:36+5:30
कोण होणार सभापती?; भाजपच्या हाती हुकूमाचे पान
पारोळ : वसई पंचायत समिती सभापतीचे आरक्षण जाहीर झाले असून हा मान इतर मागारवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) महिलेला मिळणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या की बहुजन विकास आघाडीच्या सभापती होणार, हे अद्याप निश्चित झालेले नसून भाजपचा पाठिंबा कुणाला मिळतो, यावर सर्व काही अवलंबून आहे.
७ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या वसई पंचायत समिती निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यात वसई तालुक्यातील ८ गणांपैकी ३ गणांत बहुजन विकास आघाडीला, ३ गणांत शिवसेनेला आणि २ गणांत भाजपला विजय मिळाला आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेल्या तिल्हेर गणातून अनुजा पाटील या शिवसेनेतून विजयी झाल्या व सभापतीसाठीही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण पडल्याने त्यांना सभापतीसाठी संधी आहे, तर सविता पाटील या ओबीसी महिला असून त्या सर्वसाधारण आरक्षित असलेल्या वासळई गणातून बहुजन विकास आघाडीच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत.
पंचायत समितीसाठी आरक्षण जरी ओबीसी महिला पडले असले तरी इतर आरक्षित प्रवर्गातून निवडून आलेल्या ओबीसी महिला सभापतीसाठी दावा करू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे सविता पाटील याही सभापतीपदासाठी दावेदार आहेत. पण शिवसेना व बहुजन विकास आघाडी यांच्याकडे सत्तेसाठी लागणारा जादुई आकडा नसल्यामुळे सभापतीसाठी आरक्षण पडले तरी सत्तेसाठी वसईकरांना अजून वाट पाहावी लागणार आहे.
सध्या वसई पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सेना-बविआला सत्ता स्थापन करण्याची समान संधी आहे. मात्र दोन्ही पक्षांना भाजपचा आधार घ्यावा लागणार आहे. तसे झाले तरच सत्तेचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र भाजप वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे.
भाजपच्या दोन जागा
वसई पंचायत समितीत भाजपच्या दोन जागा आहेत. वसई पंचायत समितीवर दोन ओबीसी महिला निवडून आल्याने त्या प्रवर्गातील महिला शिवसेनेकडे तर एक ओबीसी महिला सदस्य बहुजन विकास आघाडीकडे आहे. पण सत्तेसाठी भाजपचा हातात हात घ्यावा लागणार आहे.