वसई-विरार महानगरपालिकेतील 29 गावे वगळण्यासाठी हरकती!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 07:26 PM2020-11-12T19:26:21+5:302020-11-12T19:27:23+5:30
Vasai-Virar Municipal Corporation : सद्य स्थितीत कोविड-19 चा प्रादूर्भाव विचारात घेता प्रत्यक्ष सुनावण्या घेणे शक्य होणार नाही.
वसई - वसई-विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळणेबाबत 8 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावातील सर्व संबंधित व्यक्ती, नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, संघटना यांनी या विषयीच्या आपल्या लेखी सूचना व हरकती 25 नोव्हेंबर 2020 पर्यंत सादर कराव्यात असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी कळविले आहे.
सद्य स्थितीत कोविड-19 चा प्रादूर्भाव विचारात घेता प्रत्यक्ष सुनावण्या घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, लोकप्रतिनिधी यांना आपल्या लेखी हरकती, सूचना, निवेदने सादर करण्यासाठी पुरेशी संधी देणे आवश्यक असल्याने हरकती, सूचना, निवेदने लेखी स्वरुपात स्विकारण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यक्रम निश्चित केला आहे व अधिकारी यांना निर्देशित करण्यात आले आहे.
लेखी सूचना व हरकती दाखल करण्याचा कालावधी 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2020 (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत) असा राहील.
सूचना व हरकती दाखल करण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे
1) उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय वसई जि.पालघर
2) उपायुक्त (सामान्य), वसई-विरार महा नगरपालिका उपायुक्त यांचे कार्यालय, विरार जि.पालघर
3) निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर जि.पालघर
4) प्रादेशिक उपसंचालक, नगरपालिका प्रशासन विभाग, कोकण भवन नवी मुंबई.
तरी उक्त कार्यक्रमानुसार वसई-विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळण्याबाबत संबंधित इच्छुक व्यक्ती, संस्था, लोकप्रतिनिधी यांनी उपरोक्त नमुद ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत लेखी हरकती, सूचना, निवेदने सादर कराव्यात असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.