‘मधुक्रांती’ गावाकडून शहराकडे; मधमाशीपालन प्रशिक्षणाच्या माध्यमातून मधपालक घडवण्याचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:58 AM2020-12-02T01:58:17+5:302020-12-02T01:58:22+5:30
मुंबईसह विरार-वसई शहरात काही युवकांनी मधपेट्या नेऊन यशस्वीरीत्या संगोपण केले आहे. शहरात सार्वजनिक आणि रहिवासी संकुलात बाग असते.
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : मधुमक्षिका या कृषीपूरक व्यवसायाला प्रमुख व्यवसायाचे स्थान मिळवून देण्यासाठी कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे सातत्याने प्रयोग सुरू आहेत. याकरिता मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाच्या माध्यमातून मधपालक घडवून अनेकांच्या हाताला रोजगार आणि शुद्ध मधाच्या उत्पादनातून या केंद्राने आरोग्याचे देणे दिले आहे. दरम्यान, मुंबईस्थित एस्सेल वर्ल्ड या पर्यटनस्थळी मधुमक्षिका पालन सुरू करण्यात आल्याने, मधुक्रांती गावाकडून शहराकडे पोहोचविण्यात त्यांना यश आले आहे.
डहाणू तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून मुंबईमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध एस्सेल वर्ल्ड या नावाजलेल्या पर्यटनस्थळी सातेरी मधमाशीच्या दहा पेट्यांचे युनिट उभारले जात आहे. येथे पर्यावरण, अन्ननिर्मिती आणि जैवविविधता टिकविण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मधमाश्यांच्या कार्याची माहिती दिली जाणार आहे. या प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकांचा राबता असल्याने शहरातील निसर्गप्रेमी नागरिकांना या व्यवसायाची माहिती मिळेल, असे एस्सेल वर्ल्डचे उपाध्यक्ष अजित लामधाडे यांनी सांगितले.
मुंबईसह विरार-वसई शहरात काही युवकांनी मधपेट्या नेऊन यशस्वीरीत्या संगोपण केले आहे. शहरात सार्वजनिक आणि रहिवासी संकुलात बाग असते. मुंबई, ठाण्यात कांदळवन क्षेत्र असल्याने अशा ठिकाणी पाळीव मधमाश्यांच्या पेट्या ठेवणे शक्य आहे. शहरांत मधमाशीपालन हा एक वेगळा उपक्रम या केंद्रातर्फे राबविण्याचा मानस आहे. या कीटकांचे पर्यावरणात महत्त्वपूर्ण स्थान असून मधमाशीला ‘राष्ट्रीय कीटक’ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी असल्याचे कीटकशास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी सांगितले. आजवर याचा २४२९ प्रशिक्षणार्थ्यांनी लाभ घेतला असून ३१४ जणांनी व्यवसाय सुरू केला आहे.
कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्र हे महाराष्ट्रातील पहिले कृषी विज्ञान केंद्र आहे. येथे ४४ वर्षांपासून मधमाशीपालन प्रशिक्षण दिले जाते. त्याद्वारे अनेक मधुपालक घडविले आहेत. शहरी भागात उपक्रम सुरू झाल्याने मधुक्रांती घडणार आहे. - डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
पूर्वी जंगलातून मध गोळा केले जाई. या केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला दोन प्रशिक्षण वर्गांतून मधुमक्षिका पालनाविषयी शास्त्रीय माहिती दिली जाते. शहरातही हा व्यवसाय करून रोजगारनिर्मिती शक्य आहे.- प्रा. उत्तम सहाणे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड.