दुकानांसमोरील मोकळ्या जागेसह रस्त्यांवरही कब्जा; जव्हारमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 12:33 AM2021-03-23T00:33:58+5:302021-03-23T00:34:06+5:30
शहरातील शेकडो अतिक्रमणे केली जमीनदोस्त
जव्हार : जव्हार नगर परिषदेने सोमवारी शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची मोहीम सुरू केली असून, प्रथम नेहरू चौकपासून, गांधी चौक, अंबिका चौक, मांगेलवाडा, एसटी स्टँड रोड आदी ठिकाणी अतिक्रमण पथक, पोलीस सुरक्षा, जेसीबी आणि इतर अतिक्रमण मोहिमेकरिता लागणारी सर्वच साधने सोबत घेऊन धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहराला छावणीचे स्वरूप आले होते.
शहरातील पक्के गाळे व त्यासमोरील पत्र्याची शेड व गाळ्यासमोरील ओटा असे बांधकाम प्रथम जमीनदोस्त करण्यात आले. रस्त्यालगत असलेल्या छोट्या-मोठ्या पत्र्याच्या टपरीसुद्धा या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. याबाबत नगर परिषदेने दुकानधारकांना दोन महिन्यांपूर्वी प्राथमिक नोटीस बजावली होती, मात्र अचानक सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून कारवाई सुरू केली. प्रथम कारवाई केलेल्या दुकानांचे छप्पर व काही सामान थेट जेसीबीने तोडून टाकले. काही ठिकाणी रविवारी सायंकाळी नगर परिषदेने अतिक्रमणे तोडण्यासाठी सफेद पावडरची खूण केली होती. कारवाईबाबत माहिती नसल्यामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे.
शहरातील बहुतेक दुकानदारांनी आपल्या वाणिज्य गाळ्यासमोर ओटा बांधून पुढील जागेत गाळा तयार करून पुढे शटर लावून अतिक्रमण केलेले होते. नगर परिषदेने दिलेली परवानगी झुगारून गाळेधारकांनी आपले गाळे बेकायदेशीर वाढविले आहेत. त्यातही काही जणांनी तर वाढीव गाळाच्या पुढेही रस्त्यावरही आपले सामान अंथरूण अतिक्रमणाचा कळस केला होता. त्यामुळे नेहमी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. पूर्वी गाळ्यासमोरील खुल्या जागेत सामान ठेवण्याकडे नगर परिषद कानाडोळा करीत होती, मात्र खुली जागा व त्यापुढेही रस्त्यावर थाट मांडून अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळेच संपूर्ण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.