दिव्यांग विद्यार्थी बनले ओशन हीरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:40 PM2020-02-28T23:40:39+5:302020-02-28T23:40:43+5:30
चौपाटीवर स्वच्छता मोहीम; सागरी जैवविविधतेचे घेतले धडे
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे, जिद्द विशेष शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षक व पालकांसह शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी पारनाका समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवले. ड्रॉप्लेज सामाजिक संस्था आणि वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूसीएडब्ल्यूए) या प्राणीमित्र संस्थेने त्याचे आयोजन केले होते. त्यानंतर पशुवैद्य दिनेश विन्हेरकर यांनी त्यांना सागरी जैवविविधता आणि डहाणूतील कासव पुनर्वसन व सुश्रूषा केंद्राची माहिती दिली.
ठाणेकर विद्यार्थी त्यांच्या शिक्षक व पालकांसह शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास पारनाका किनाºयावर दाखल झाले. त्यांनी हातात मोजे घालून चौपाटीवर भरतीच्या लाटांसह आलेले प्लास्टिक, पॉलिथीन पिशव्या आणि नायलॉन दोºया गोळा केल्यावर डहाणू नगर परिषदेने त्याचे संकलन केले. या ओशन हिरोजच्या कार्याची दखल स्थानिक आणि पर्यटकांनी घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर सभागृहात पशुवैद्य दिनेश विन्हेरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यांनी समुद्रातील पर्यावरण संरक्षण व संवर्धनाकरिता मदत करणाºया जीवांची माहिती ‘ओशन हीरो’ या अॅनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून दिली. त्यानंतर प्लास्टिकनिर्मित कचºयापासून विविध आजार होऊन हे जीव कसे मृत्युमुखी पडतात. हा कचरा समुद्रात कसा येतो. त्याला रोखण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता याविषयी दृक्श्राव्य माध्यमातून समजावण्यात आले, तर डहाणूतील डब्ल्यूसीएडब्ल्यूए या प्राणीमित्र संस्थेने वन विभागाच्या माध्यमातून सागरी कासवांकरिता सुरू केलेल्या देशातील पहिल्या सुश्रुषा आणि पुनर्वसन केंद्राची माहिती आणि कार्य पद्धती चलचित्रातून दाखवली. कासवांचा जीवनपट पाहून विद्यार्थी भारावले होते. समुद्रकिनारा स्वच्छतेच्या माध्यमातून सागरी जैवविविधतेला हातभार लावण्याची स्वच्छता अभियानाची गरज व्यक्त करण्यात आली.
कासवांची कहाणी : कासवाची प्रतिकृती हातात घेऊन पशुवैद्य विन्हेरकर यांनी त्यांची शारीरिक रचना दाखवली तर अॅनिमेटेड व्हिडिओची मदत घेऊन कासवांच्या जन्मापासून ते खोल समुद्रातील विहार, भक्ष्यांचा शोध, अन्न ग्रहण, प्लास्टिक कचºयामुळे जडणारे विकार तसेच हजार अंड्यातून केवळ २० कासव जगतात. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाची माहिती देण्यात आली.