श्वान निर्बीजीकरण केंद्राविरोधात गुन्हा
By admin | Published: October 12, 2016 03:59 AM2016-10-12T03:59:03+5:302016-10-12T03:59:03+5:30
निर्बीजीकरण करताना मृत्यू पडलेल्या श्वानाचे परळच्या पशू रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हलगर्जीपणा आणि चुकीची शस्त्रक्रि या यामुळे श्वानाचा मृत्यू
शशी करपे / वसई
निर्बीजीकरण करताना मृत्यू पडलेल्या श्वानाचे परळच्या पशू रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हलगर्जीपणा आणि चुकीची शस्त्रक्रिया यामुळे श्वानाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यामुळे याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात केंद्राचे संचालक डॉ. जगदीश पाटील यांच्याविरोधात वन्यजीव पशू कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर केंद्रीय पशू कल्याण मंडळाने केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
वसई विरार शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण रोखण्यासाठी वसई विरार महापालिकेने नवघर-माणिकपूर शहरात श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू केले आहे. ठाणे येथील अॅनिमल फ्रेंडस वेल्फेअर पब्लिक सोसायटी या संस्थेला निर्बीजीकरणाचा ठेका देण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या केंद्रात दररोज १० ते १५ श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात येते.
येथील केंद्रात निर्बिजीकरणासाठी आणलेल्या श्वानांची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यांना क्रूरतेने हाताळले जाते असा आरोप पूर्वीपासून प्राणीमित्र संघटना करत होत्या. जुलै महिन्यात रस्त्यावर एक श्वान अत्यवस्थ अवस्थेत प्राणी मित्रांना आढळून आला होता. या श्वानावर केंद्रात निर्बिजीकरण शस्त्रक्रिया झालेली होती. परंतु शस्त्रक्रियेनंतर लगेचच त्याला बाहेर सोडण्यात आल्याने पोटाचे टाके फुटून त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वसईतील प्राणीमित्र नंदा महाडिक यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
परळच्या पशू रुग्णालयात या श्वानाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हलगजीने आणि चुकीच्या शस्त्रक्रि येने मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यामुळे माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी केंद्राचे संचालक डॉ. जगदीश पाटील यांच्याविरोधात वन्यजीव पशू कायदयाच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नंदा महाडीक आणि सलीम चरणीया या दोन प्राणीमित्रांनी याप्रकरणी केंद्र सरकारच्या पशू कल्याण मंडळाकडे तक्रार दाखल केली होती.