अधिकारी, ठेकेदारांविरोधात गुन्हा
By admin | Published: June 5, 2016 02:44 AM2016-06-05T02:44:08+5:302016-06-05T02:44:08+5:30
वसई रोडरेल्वे स्टेशनमध्ये गटाराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेविरोधात सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन फिर्याद दिल्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात नगरपालिकेच्या तत्कालीन
वसई : वसई रोडरेल्वे स्टेशनमध्ये गटाराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेविरोधात सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन फिर्याद दिल्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात नगरपालिकेच्या तत्कालीन अधिकारी, ठेकेदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे तपास करत आहेत.
३१ मेला सकाळी साडेआठच्या सुमारास फलाट क्र. १ कडे जाणाऱ्या गटारावरील स्लॅब अचानकपणे तुटून २० ते २५ लोक या गटारात पडले होते. गर्दीच्या वेळी झालेल्या या अपघातात जीवित हानी झालेली नसलीतरी यामध्ये भार्इंदर येथील जिगीश गंगाधर नायर व अन्य १० ते १५ पुरुष व महिला गंभीर व किरकोळ जखमी झालेले आहेत. याबाबत पालिकेने स्वयंस्फूर्तीने दोषी व जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता होती. मात्र सामाजिक भान ठेवून अशोक वर्मा या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
दरम्यान अशोक वर्मा यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे गटार बांधण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट प्रतीचे असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. या गटारावर दुचाक्या पार्किंग करण्यात येत असून त्याच मार्गावरून पादचारी ये-जा करीत आहेत. (प्रतिनिधी)
अखेर समजासेवकानेच घेतला पुढाकार
या गटारीची देखभाल करणारे, तिचे बांधकाम करणारे अथवा या गटारीवरील रोडचा पादचाऱ्यांनी येण्या-जाण्यासाठी वापर करू नये’, असे कोणतेही बोर्ड वसई-विरार महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी, इंजिनिअर, कंत्राटदार अथवा त्या गटाराची देखभाल करीत असलेल्या संबंधित जबाबदार व्यक्तींनी लावलेले नाही. या गटाराचे काम करतांना त्यासाठी वापरण्यात आलेला पैसा हा जनतेचा असून संबंधितांनी तिचे निकृष्ट बांधकाम करून जनतेची फसवणूक करून त्यात भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.