हॉस्पिटल बंद ठेवणाऱ्या खाजगी डॉक्टरवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:57 AM2020-04-28T01:57:36+5:302020-04-28T01:57:49+5:30
हॉस्पिटल बंद ठेवणा-या एका डॉक्टरवर आता गुन्हा दाखल झाला आहे. वसई तालुक्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.
वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकारी व वसई-विरार महापालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील डॉक्टर्सना त्यांचे खाजगी दवाखाने, रुग्णालये चालू ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. काहींना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. मात्र नोटीसला केराची टोपली दाखवत हॉस्पिटल बंद ठेवणाºया एका डॉक्टरवर आता गुन्हा दाखल झाला आहे. वसई तालुक्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.
डॉ. प्रवीण कुमार हे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव असून वसई रोड येथील नवघर-माणिकपूर शहरातील दत्तात्रय शॉपिंग सेंटर, पार्वती टॉकीजजवळ हे हॉस्पिटल-क्लिनिक आहे. नोटीस बजावूनही महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हॉस्पिटल उघडे न ठेवणाºया डॉ. प्रवीण कुमार यांच्याविरुद्ध पालिकेचे आरोग्य निरीक्षक जितेंद्र नाईक यांनी फिर्याद दाखल करून माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिकेच्या ‘एच’ प्रभागातील खाजगी हॉस्पिटल व दवाखाने बंद असल्याबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यासंदर्भात सर्व खाजगी हॉस्पिटल व दवाखान्यांना पालिका कार्यालयाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर बहुतांश डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडले, परंतु डॉ. प्रवीण कुमार यांनी त्यांचे खाजगी हॉस्पिटल ३१ मार्चपासूनच बंदच ठेवले आहे. यामुळे पालिकेच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पालिकेच्या नवघर विभागीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक जितेंद्र नाईक यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात डॉ. प्रवीण कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
>वसई-विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ‘कोविड’व्यतिरिक्त अन्य आजारांसाठी नागरिकांना डॉक्टरकडे जावे लागते. मात्र, त्या सेवा खाजगी डॉक्टरांनी बंद केल्या आहेत. प्रशासनाने नोटिसा देऊनही बंद दवाखाने डॉक्टर मंडळी उघडत नाहीत, ही बाब गंभीर असून याची तक्रार आपण नवनियुक्त आयुक्त गंगाधरन देवराजन यांच्याकडे केल्यावर त्यांनी सर्व प्रभाग समिती सहायक आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याची तसेच दवाखाने व हॉस्पिटल न उघडणाºया डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा, असे आदेशच दिले आहेत. यातूनच ही कारवाई झाली आहे.
- मिलिंद चव्हाण, उपशहरप्रमुख, शिवसेना वसई रोड