वाढवण बंदर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 01:55 AM2020-11-28T01:55:08+5:302020-11-28T01:55:29+5:30
मोटारसायकल रॅली स्थगित : कोरोनामुळे सरकारची दडपशाही?
डहाणू : वाढवण बंदरविरोधी जनजागृती करण्याबरोबरच जेएनपीटीकडून बंदराच्या निरनिराळ्या कामांचे ठेके घेणाऱ्या ठेकेदारांचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेली मोटारसायकल रॅली पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना भल्या पहाटेच ताब्यात घेतल्याने स्थगित करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही रॅली होऊ नये, यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण अवलंबल्याचा आरोप केला जात आहे.
वाढवण बंदरविरोधी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शुक्रवारी भल्या पहाटेपासूनच वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या वेगवेगळ्या गावांत राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आणि त्यांना ताब्यात घेतले. वाणगाव पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या चिंचणी आउटपोस्टवर त्यांना नेण्यात आले. शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी केवळ मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र कोरोना महामारी काळात आंदोलन केल्याचा ठपका ठेवत बंदरविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, सचिव वैभव वझे, उपाध्यक्ष अशोक अंभिरे, हरेश्वर पाटील, हेमंत तामोरे, हेमंत पाटील आदींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्यामुळे वातावरण तंग झाले.
दरम्यान, रात्रीपासून पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेट लावून नाकेबंदी करून ठेवल्याने इतर गावांवरून येणाऱ्या लोकांना पोलिसांनी रोखून धरले. त्याच वेळी वाढवण-टिघरेपाडा येथे प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही लोकांनी ‘पोलिसांनी नेलेल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना आणून सोडा, अन्यथा आम्ही हटणार नाही’, अशी भूमिका घेतल्याने आणि घोषणाबाजी केल्याने तणाव अधिकच वाढला. अखेर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अल्पेश विशे यांना वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता मोटारसायकल रॅली स्थगित केल्याचे सांगितले आणि लोकांचीही समजूत काढली. यामुळे वातावरण निवळले.