विरारच्या पापडखिंड धरणात तेलाचे तवंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 06:09 AM2018-11-17T06:09:23+5:302018-11-17T06:09:54+5:30
हजारो दिवे कारणीभूत : दूषित पाण्यामुळे आरोग्यसमस्या
वसई : येथील पापडखिंड धरणात पालिकेचा विरोध असतानाही करण्यात आलेल्या छटपूजेमुळे येथील पाणी दूषित झाले आहे. तेलाचे हजारो दिवे पाण्यात सोडण्यात आल्याने धरणाच्या पाण्यावर तेलाचा तवंग पसरला आहे. या धरणातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याने आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात मंगळवारी छटपूजा करण्यात आली. मात्र फूलपाडा येथील पापडखिंड धरणात हजारो नागरिकांनी उतरून छटपूजा केली. यावेळी तेलाचे दिवे, निर्माल्य धरणाच्या पाण्यात सोडण्यात आले. यामुळे पाणी दूषित झाले. बुधवारी धरणाच्या पाण्यावर तेलाचे तवंग साचल्याचे आढळून आले. छटपूजेमुळे धरण परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. पूजेनिमित्त आणलेले साहित्य, निर्माल्याचा कचरा जागोजागी पडलेला होता. बुधवारी महापालिकेने धरण परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली. महापालिकेने धरणातील पाणी पिण्याच्या वापरासाठी बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्ष हे पाणी अजूनही नागरिकांना पिण्यासाठी दिले जात असल्याचे उघड झाले आहे. पाणी दूषीत झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
तालुक्यातील अनेक तलावांत छटपूजा
च्जुचंद्र येथील गोडे तलावातही छटपूजा करण्यात आल्याने या तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. नायगाव पूर्व भागातील परप्रांतीयांची लोकसंख्या वाढत आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय नागरिकांनी येथील जुचंद्र गोडे तलावाला घेराव घालून रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी केली. गोडे तलावाला हजारो परप्रांतीय नागरिकांचा वेढा पडला होता.
च्त्यामुळे स्थानिक नागरिकांची गोची झाली. प्रचंड वाहतूक कोंडीला त्यांना सामोरे जावे लागले. तसेच छटपूजेनंतर मोठ्या प्रमाणात गोडे तलावाजवळ कचरा टाकण्यात आला आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन हा कायद्यने गुन्हा असतानादेखील फटाके वाजवण्यात आले.बोळींज येथील तलाव तसेच विरार पूर्व मोरेगाव तलाव,नालासोपारा आचोळा येथील तलाव तसेच चक्रेश्वर तलावेतही हिच परिस्थिती होती.
गेल्या काही वर्षांपासून या छटपूजेला विरोध करत आहोत.
आजही हे पाणी आम्हाला पिण्यासाठी पालिका देते. तेलाचे दिवे, निर्माल्य पाण्यात सोडून छटपूजा केली जात आहे. छटपूजेला विरोध नाही, मात्र पिण्याचे पाणी अशुद्ध करण्यास आमचा कायम विरोध राहील.
-विलास चोरघे, सामाजिक कार्यकर्ते,विरार