मुंबई अहमदाबाद हायवेवर सूर्याची जुनी जलवाहिनी फुटली; दुरुस्तीसाठी लागणार १२ तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 12:44 PM2021-06-05T12:44:00+5:302021-06-05T12:44:31+5:30
नवीन योजनेतून शहराला पाणीपुरवठा कमी दाबाने राहणार, खानिवडे गावाजवळील टोल नाक्याजवळ घटना
आशिष राणे
वसई- विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणारी सूर्या धरणाची जुन्या योजनेची जलवाहिनी शनिवार (दि.5 जून ) रोजी सकाळी 10:00 वाजता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खानिवडे गावाजवळील टोल नाक्याजवळ फुटली असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लोकमत ला सांगितले. या बाबतीत अधिक माहिती देताना ,पाणीपुरवठा विभागाने सांगितले की,या जुन्या नादुरुस्त जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या नादुरुस्त फुटलेल्या जलवाहिनी च्या दुरुस्तीसाठी पुढील 10 ते 12 तास लागणार असल्याची माहिती देखील वसई विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकानी लोकमत ला दिली. दरम्यान या जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने त्यातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील तर या दरम्यान नवीन योजनेतुन होणारा पाणीपुरवठा मात्र शहरात कमी दाबाने चालू राहणार आहे.
तर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होई पर्यंत वसई -विरारकरांना शनिवारी व रविवारी पाणीपुरवठा हा कमी दाबाने राहील असे ही स्पष्ट केले. तरी वसईतील नागरिकांनी वसई विरार शहर महापालिकेस सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.