ऑलिम्पिक तरणतलाव बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 11:22 PM2020-02-13T23:22:07+5:302020-02-13T23:22:15+5:30
महापालिका प्रशासन व महापौरांचे दुर्लक्ष : डिसेंबरपासून नागरिकांची होतेय गैरसोय
आशीष राणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या एच प्रभाग समिती अंतर्गत आॅलिम्पिक दर्जाचा तरणतलाव आधी एका बालकाच्या मृत्यू प्रकरणामुळे बंद केला होता. तर मधल्या काळात याच तरणतलावाला खालून गळती लागल्याने डिसेंबर-२०१९ या महिन्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी हा जलतरण तलाव बंद ठेवण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांचे पुरते हाल होत असून ज्यांनी ज्यांनी येथे पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी वर्षभराचे पास काढले आहेत, त्यांना मात्र याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वसई पश्चिमेतील माणिकपूर परिसरात महापालिकेतर्फे२५ बाय १५ मीटर सें.मी. आॅलिम्पिक दर्जाचा तरणतलाव तयार करण्यात आला आहे. या जलतरण तलावात सकाळ व संध्याकाळच्या सुमारास नागरिक पोहण्यासाठी येत असतात. मात्र मध्यंतरी एप्रिल महिन्यात या तलावात बुडून एका आठ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा स्विमिंग पूल पोहण्यासाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर आॅक्टोबर-२०१९ मध्ये हा जलतलाव पोहण्यासाठी पालिकेने पुन्हा सुरू केले होते. परंतु डिसेंबर महिन्यात या जलतरण तलावाच्या देखभालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने त्याला गळती लागून यातून मोठ्या प्रमाणात (हजारो लिटर) पाणी वाहून जात असल्याचे त्या वेळी लोकमत व इतर माध्यमांनी समोर आणले होते.
दरम्यान सदरची स्विमिंग पुलामधील पाणी दररोज कमी होऊन पोहणाऱ्यांची गैरसोय व्हायची. त्यामुळे ज्या ठिकाणी नेमकी स्विमिंग पुलाला गळती लागली होती, मात्र तेव्हा पाणी नेमके कुठून कमी होत आहे हे कळत नव्हते. त्यामुळे दोष असलेल्या त्या त्या भागांची तांत्रिक दृष्ट्या दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सर्व करदाते नागरिकांनी या ठिकाणी असलेल्या व्यवस्थापकांकडे केली होती. त्यामुळे या सुरुवातीला बºयाच दिवसांनी येथील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र आश्चर्य म्हणजे बांधकाम व पाणी खाते एकमेकांना दोष देत असल्याचे खरे कारण त्या वेळीही ‘लोकमत’ने समोर आणले होते. परंतु आज फेब्रुवारी उजाडून दोन महिने उलटूनही हा स्विमिंग पूल अद्यापही नादुरुस्त असून सद्यस्थितीत दुरुस्तीच्या कामासाठी हा बंदच ठेवण्यात आला आहे. परिणामी या बंद असलेल्या जलतरण तलावामुळे येथे पोहण्यास येणाºया करदाते व नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
आज ज्यांनी ज्यांनी तीन किंवा सहा महिने आणि वर्षभराचा पोहण्यासाठी पास काढला आहे, त्यांचे या आधीही आणि आताही दोन महिन्याचे पैसे वाया नाही तर या बंद स्विमिंग पुलाच्या पाण्यात गेले आहेत. त्यामुळे हे आॅलिम्पिक दर्जाचे जलतरण तलाव महापालिकेने लवकर सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.
त्वरित काम पूर्ण करू : महापौर
‘लोकमत’ने २० डिसेंबर २०१९ च्या अंकात ‘आॅलिम्पिक दर्जाच्या तरण तलावाला गळती, पालिका प्रशासन व ठेकेदाराचे दुर्लक्ष? तर दररोज शेकडो लिटर पाणी वाया’ अशा मथळ्याखाली दणकेबाज वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वेळी महापौर प्रवीण शेट्टी यांनी आम्ही त्वरित हे काम पूर्ण करू, असे सांगितले होते.
हा जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करतो, असे आश्वासन त्यांनी दिले होते, मात्र दोन महिन्यांत कदाचित आयुक्त नसल्याने अथवा महापौर शेट्टी यांनी या जलतरण तलावा-संदर्भात माहितीच घेतली नसावी म्हणून येथील दुरुस्तीचे काम व तरण तलाव बंद आहे, असेच काहीसे चित्र वाटते आहे.
आपण जलतरण तलाव दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून अजून काही दिवस हे काम चालेल. दोष कुठे होता तो मिळाला, आहे लवकरच पूल सुरू करू! तसेच ज्यांची वर्षभर, सहा महिने, तीन महिने सभासद फी भरून तसे शुल्क भरणा केले असेल त्यांना सध्या पर्याय म्हणून ते वसई ताम तलाव येथे जाऊ शकतील. पण प्रवास व वेळ हे संयुक्तिक होणार नाही, मात्र आम्ही ज्यांचे पास व आर्थिक नुकसान होईल त्यांना नक्कीच सवलत देऊ.
- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई-विरार महापालिका
सुरुवातीला जेव्हा बांधकाम विभाग व आपल्या अभियंत्यांना नेमकी स्विमिंग पुलाला गळती कुठून लागली आहे हे कळले नव्हते. मात्र आता या स्विमिंग पुलाची सखोल पाहणी करून त्याचा दोष शोधून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. पालिकेचा प्रयत्न राहील की लवकरच हा स्विमिंग पूल नागरिकांसाठी खुला करावा, तरीही अजूनही १५ ते २० दिवस काम पूर्णत्वास जातील.
- प्रकाश रॉड्रिक्स, उपमहापौर, वसई-विरार
या जलतरण तलावाला गळती लागली असल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जलतरण तलाव बंद आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल व हा जलतरण तलाव नागरिकांसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता,
वसई-विरार महापालिका