Omicron Variant : वसई-विरारकरांना मोठा दिलासा! ओमायक्रॉन संशयित रुग्णाचा अहवाल आला निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:29 PM2021-12-16T12:29:15+5:302021-12-16T12:31:43+5:30
Omicron Variant : पालघर जिल्ह्यातील पहिला ओमाय़क्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता तर या वृत्ताने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती.
आशिष राणे
वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात १४ डिसेंबर, २०२१ रोजी पालघर जिल्ह्यातील पहिला ओमाय़क्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता तर या वृत्ताने समस्त आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. मात्र कस्तुरबा रुग्णालयाने या बाधित मात्र काहीही लक्षणं नसलेल्या रुग्णाची पुणे येथील लॅब मध्ये एनेलेसीस चाचणी केली असता हा रुग्ण सुरुवातीला पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केलं. बुधवारी केलेल्या तपासणी त हा रुग्ण निगेटिव्ह असल्याची माहिती वसई विरार पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने लोकमतला दिली.
मंगळवारी आढळून आलेला नालासोपारा स्थित रुग्ण हा मुंबई येथे शुटींगच्या ठिकाणी विद्युत विभागात काम करीत असून ३ डिसेंबर रोजी हा रुग्ण भांडूप येथे शुटींगच्या कामानिमित्त गेला असता तिथे त्या रुग्णाची कोविड चाचणी करण्यात आली होती तर या चाचणीसाठी घेतलेले सॅम्पल हे कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई येथे तपासणी करिता पाठविण्यात आले व तेथे हा रुग्ण कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. परंतु रुग्णाला कोणतीही लक्षणे नसल्यामुळे त्याला राहत्या घरीच होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते.
परिणामी रुग्णाचे तपासणीसाठी घेण्यात आलेले सॅम्पल्स हे कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई येथून एन आय व्ही (NIV), पुणे येथे Analysis चाचणीसाठी पाठविण्यात आले. एन आय व्ही, पुणे येथील Analysis मध्ये सदर रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल १४ डिसेंबर, २०२१ रोजी महानगरपालिकेला प्राप्त झाला होता.
नालासोपारा येथील पहिला ओमायक्रोन रुग्ण निघाला निगेटिव्ह
सतर्कता म्हणून मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातुन अहवाल वसई विरार महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळताच रुग्णाची प्रथमत: अँटीजन चाचणी करण्यात आली होती व या चाचणी तो रुग्ण कोविड निगेटिव्ह आला होता तरीही खबरदारी म्हणून या रुग्णाची आर टी पी सी आर चाचणीही करण्यात आली त्याचा अहवाल १५ डिसेंबर, २०२१ रोजी सकाळी प्राप्त होणार होता विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच हा रुग्ण सुस्थितीत होता व त्याला कोणतीही लक्षणे नाहीत असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी सांगितले होते.
सदर रुग्णास वसई विरार महानगरपालिकेच्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते मात्र आता बुधवारी १५ डिसेंबर, २०२१ रोजी त्या रुग्णाच्या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आणि हा रुग्ण कोविड निगेटिव्ह असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे रुग्णाच्या कुटुबांतील व्यक्तींचीही आर टी पी सी आर (RTPCR) चाचणी करण्यात आली होती व त्या सर्वांच्या चाचणीचा अहवाल कोविड निगेटिव्ह आल्याची माहीती आरोग्य विभागाच्या वतीने जनसंपर्क अधिकारी गणेश पाटिल यांनी लोकमतला दिली.