ऑन द स्पाॅट: गुजरातनेच सांभाळायचे का पालघरच्या आदिवासींचे आराेग्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 07:35 AM2023-09-23T07:35:49+5:302023-09-23T07:36:08+5:30

जिल्ह्यातील अभद्र युतीमुळे आराेग्य यंत्रणा सुधारेना

On the spot: Should Gujarat take care of the health of Palghar tribals? | ऑन द स्पाॅट: गुजरातनेच सांभाळायचे का पालघरच्या आदिवासींचे आराेग्य?

ऑन द स्पाॅट: गुजरातनेच सांभाळायचे का पालघरच्या आदिवासींचे आराेग्य?

googlenewsNext

हितेन नाईक

पालघर : जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पोहाेचत नसल्याने झोळीतून उपचारासाठी नेताना होणारे मृत्युसत्र आजही थांबता थांबत नाही. सर्पदंश आणि प्रसूतीनंतर काही तासात महिलेचा होणारा मृत्यू एकूणच जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. त्यामुळे दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णाला एक तर खासगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागतो किंवा गुजरात राज्यातील वापी, वलसाड आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिल्वासाकडे वळावे लागत आहे. 

पालघर ग्रामीण रुग्णालयात साप चावलेल्या एका ३२ वर्षीय महिलेला मृत्यूला सामोरे जावे लागले होते, तर बुधवारी एका २९ वर्षीय तरुणीची यशस्वी प्रसूती झाल्यावर काही तासातच ती अत्यवस्थ झाल्याने तिला सिल्वासा येथे नेताना ऑक्सिजन सिलिंडर सेवा नसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. 

जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड, तलासरी, डहाणू तालुक्यातील हजारो रुग्णांना वापी, वलसाड, सिल्वासामधील आरोग्य सेवा कमी त्रासदायक, कमी खर्चिक आणि विश्वासपात्र वाटू लागल्याने त्या भागाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. मुंबई आणि ठाणे येथील रुग्णालयात रुग्णाला तत्काळ दाखल करण्याऐवजी गुजरातकडे वळणे पसंत करतो.    जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालय आणि लॅब सेवा, मेडिकल दुकाने यांची अंतर्गत अभद्र युती रुग्णांचे आर्थिक शोषण करण्यासाठी एकत्र येत असल्याचा आरोप केला जात आहे.

आरोग्य यंत्रणेची अशी आहे स्थिती
वसई - विरार महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सकअंतर्गत डहाणू, जव्हार आणि कासा अशी तीन उपजिल्हा रुग्णालये, एक आश्रम पथक आणि पालघर, मनोर, बोईसर, तलासरी (आश्रमशाळा पथक), वाणगाव, मोखाडा, विक्रमगड, वाडा आणि विरार अशी नऊ ग्रामीण रुग्णालये आहेत. 

अनेक पदे अद्यापही रिक्त
पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून १८ प्राथमिक आरोग्य पथके, नऊ जिल्हा परिषद दवाखाने, ३१२ इतकी उपकेंद्र आहेत. या केंद्रांत एकूण २,०७६ मंजूर पदे असून १,०१० पदे भरण्यात आली असून कंत्राटी पद्धतीने अन्य ५८७ पदे भरली असल्याने ४७६ पदे रिक्त आहेत. तर अन्य क, ड वर्गातील ५७४ मंजूर पदांपैकी ५०५ पदे भरण्यात आली असून ६९ पदे रिक्त आहेत.

Web Title: On the spot: Should Gujarat take care of the health of Palghar tribals?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.