एक कोटीची पाणीयोजना बंद
By admin | Published: October 14, 2016 06:15 AM2016-10-14T06:15:08+5:302016-10-14T06:15:08+5:30
डहाणू तालुक्यातील विवळवेढे (महालक्ष्मी) ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ९ लाख रु पये खर्च करु न सुरु केलेली पेयजल योजना वीज जोडणी
शौकत शेख / डहाणू
डहाणू तालुक्यातील विवळवेढे (महालक्ष्मी) ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ९ लाख रु पये खर्च करु न सुरु केलेली पेयजल योजना वीज जोडणी खंडित केल्याने बंद आहे. त्यामुळे डोंगरीपाडा आणि पडवळपाडा येथील ग्रामस्थ शुद्ध पाण्याला मुकले असून ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांना विहिरीतून उपसून दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याची बाब आमदार अमित घोडा, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश धोडी, डहाणू पंचायत समिती सभापती चंद्रिका आंबात, गट विकास अधिकारी रमेश अवचार यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केल्यावर उघडकीस आली आहे.
त्वरीत उपाययोजना करण्याचे आदेश गटविकास अधिकारी आणि पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता तांडेल यांना लेखी दिले असले तरी तालुक्यातील एकंदरीत परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र समोर आले आहे.
ग्रामविकास अधिकारी व्ही.बी. भोईर हे विवळवेढे ग्रामपंचायतीमध्ये मागील सात वर्षांपासून ग्रामसेवक आहेत. मात्र त्यांच्या अकार्यक्षम कार्यपध्दतीचा ग्रामस्थांनी पंचनामा केला आहे. तर डहाणू तालुक्यातील वेती ग्रामपंचायत आणि विवळवेढे ग्रामपंचायतीमधील आदिवासी पाड्यांवरील योजनांचे मूल्यांकन करुन उर्वरित रक्कम संबंधितांकडून वसूल करून गंभीर कारवाई करण्याचा इशारा माजी जि.प.सदस्य जगदीश धोडी यांनी दिला.
विवळवेढे ग्रामपंचायतीमध्ये चार वर्षापूर्वी १ कोटी ९ लाख रुपयाचा निधी खर्च करुन विवळवेढे पेयजल योजना सुरु केली. मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विजेचे बील न भरल्याने महावितरणने योजनेचा वीज पुरवठा खंडित केल्याने ती मागील वर्षापासून धूळखात पडली आहे.
त्यामुळे विवळवेढे (महालक्ष्मी) डोंगरीपाडा, पडवळपाडा या पाड्यातील आदिवासींवर खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ ओढवली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामसेवक व्ही.बी. भोईर त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने काही ग्रामस्थांनी आदिवासी कार्यकर्ते अशोक भोईर यांच्याकडे तक्रार मांडली.
त्यानंतर माजी जि.प.सदस्य जगदीश धोडी यांच्यामार्गदर्शनाखाली डहाणू पंचायत समितीकडे सप्टेंबरात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ही बाबी निदर्शनास आणून देवून त्वरीत उपाय करण्याची सूचना केली होती.