आगीत होरपळून एकाचा मृत्यू; मीरा-भाईंदरमध्ये बेकायदा ५० गोदाम, झोपड्या खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:10 AM2024-02-29T10:10:45+5:302024-02-29T10:10:54+5:30

व्यावसायिक शेडमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. प्लास्टिक-भंगार, लाकूड सामान यामुळे आग पसरू लागली.

One died in the fire; 50 illegal godowns, shacks in Mira-Bhyander | आगीत होरपळून एकाचा मृत्यू; मीरा-भाईंदरमध्ये बेकायदा ५० गोदाम, झोपड्या खाक

आगीत होरपळून एकाचा मृत्यू; मीरा-भाईंदरमध्ये बेकायदा ५० गोदाम, झोपड्या खाक

लोकमत न्यूज नेटवर्क 
मीरा रोड : भाईंदर पूर्वेला आझादनगर भागातील मीरा-भाईंदर महापालिकेच्या आरक्षणाच्या मालकी जागेवरील बेकायदा ५० ते ६० गोदामे, झोपड्या खाक झाल्या. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे गॅस सिलिंडरचे ४-५ स्फोट होऊन भडका उडाला. या दुर्घटनेत एकाचा  मृत्यू झाला असून, ६ जण जखमी झाले आहेत. त्यातील दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अथक प्रयत्नाअंती अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

व्यावसायिक शेडमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. प्लास्टिक-भंगार, लाकूड सामान यामुळे आग पसरू लागली. भीषण आगीत सिलिंडरचे स्फोट झाल्याने दीपक चौरसिया (४२) याचा मृत्यू झाला. तो येथे एक पानटपरी चालवत होता. आगीची माहिती मिळाल्यावर गिरीश उपाध्याय हे त्यांचा १४ वर्षांचा मुलगा किरणसह गॅरेज पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी ताे जखमी झाला.

अग्निशमन जवान जखमी
मीरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान शिवाजी सावंत हेही यावेळी जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर अन्य संतोष पाटील व हितेश पाटील हे दोन जवान जखमी झाले आहेत.

इतर अग्निशमन दल आले मदतीला
आगीची माहिती समजताच मीरा-भाईंदर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीचे भीषण स्वरूप पाहून मुंबई, ठाणे व वसई-विरार पालिकेच्या अग्निशमन दलांना पाचारण केले. मीरा-भाईंदरच्या १०, मुंबईच्या ७, ठाणे २ तर वसई-विरारची ३ वाहने घटनास्थळी आली. 

Web Title: One died in the fire; 50 illegal godowns, shacks in Mira-Bhyander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.