विक्रमगड तालुक्यात अनेक गावी एकच होळी
By admin | Published: March 9, 2017 02:20 AM2017-03-09T02:20:11+5:302017-03-09T02:20:11+5:30
आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण खेडया-पाडयात आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी
- राहुल वाडेकर, विक्रमगड
आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण खेडया-पाडयात आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, दादडे या भागात मात्र आजही पारंपारिक पध्दतीनेच सण साजरे करण्यात येतात़ त्यानुसार या गावात एक गाव एक होळीची परंपरा आजही कायम आहे़
पहिले तीन दिवस छोटया होळया, चौथ्या दिवशी चोरटी होळी आणि शेवटच्या म्हणजेच १२ मार्चला पाचव्या दिवशी मोठी होळी असा पाच दिवस हा सण साजरा केला जातो़ या पाच दिवसांत लहान मुले वाजवत असलेल्या डफऱ्यांचा (डफली) आवाज आजही शिमग्याला पारंपारिक रुप देतो आहे़ चोरटी होळीसाठी तरुण गावातूनच लाकडे चोरुन आणतात़ पाचव्या दिवशी सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने मोठी होळी रचली जाते़ या होळीची पारंपारिक पध्दतीने पुजा केली जाते़ गावातील नवविवाहीत जोडप्यांनी या होळीभोवती पाच फेऱ्या मारण्याची पध्दत आहे़ त्यानंतर होळी पेटविली जाते़
होळीत भाजलेल्या नारळांचा प्रसाद घेण्यासाठी सर्वांचीच झुंबड उडत असते़ साखरेच्या पाकापासून तयार केलेले हार लहान मुले होळीच्या दिवशी गळयात घालत असतात. दरवर्षी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते. त्या जागेला होळीची माळ असे म्हणतात़
याच माळावर पाच दिवस विविध खेळ, गरबानृत्य, मनोरंजनात्मक कार्यक्रम, तर ग्रामीण खेडया पाडयावर तारपा नृत्य, ढोलनाच, लेझीम, व सामूहिक गरबानृत्य असे विविध कार्यक्रम रात्रभर आयोजिले जातात़ होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी घरोघरी पुरणपोळया केल्या जातात़ धूलिवंदनाला मनसोक्त धुळवड खेळली जाते़ तर रंगपंचमीला गावाकडे झाडा-फुलांपासून तयार केलेले नैसर्गीक रंगच वापले जातात़
पोस्त मागण्यांची परंपरा आजही कायम
होळीसाठी सद्यस्थितीत विक्रमगड बाजार फुललेला असून आजूबाजूच्या खेडयावरील आदिवासी लोक बाजाराप्रमाणे चार दिवस गर्दी करीत आहेत. पोसत मागण्याकरीता वेगवेगळया वेषात त्यामध्ये कुणी पुरुष महिलेचे कपडे घालून त्यावेशात तर कुणी तोंडाला अंगाला रंग लाऊन वेगळा पेहराव करुन अगर फुटलेला पÞत्राचा डबा वाजवत, तोंडाला जोकर आदींचा मुखवटा लाऊन घराघरातून दुकानदारांकडून पोस्त (पैसे) मागत असतात. हेच दृष्य धूळवडीपर्यंत चालत असते़
पत्नीला खांद्यावर घेऊन होळीला प्रदक्षिणा : होळीच्या दिवशी भेंडीचे झाड (फांदी)अगर बांबूच्या फांदया होळीमाता म्हणून आणून त्याची पूजा केली जाते़ पूजेला तांदळाच्या नागलीच्या व कुरडई पापडया, पुरणपोळी घरी बनवलेल्या वस्तंूचा नैवैद्य दाखविला जातो़ बांबू किंवा भेंडींच्या फांदीला टोकाला खेडयावर कोंबडीचे पिल्लु बांधले जाते. ही प्रथा आजही आबाधित आहे़ त्याचप्रमाणे नविन लग्न झालेली जोडपी आपल्या पत्नीला खांदयावर घेऊन होळी मातेला प्रदक्षिणा घालण्याची अशी प्रथा असून त्याची आजही अंमलबजावणी होत आहे़