हंडाभर पाण्यासाठी एक तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:31 PM2019-05-24T23:31:05+5:302019-05-24T23:31:10+5:30
कुपनलिकेचे थेंब थेंब पाणी : कुयलू येथील महिलांनी मांडली कैफियत
- वसंत भोईर
वाडा : तालुक्यातील कुयलू ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गाव पाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एक हंडाभर पाण्यासाठी एक तासाचा कालावधी कुपनलिकेला लागत असल्याची कैफियत येथील महिलांनी मांडली. पाणी पुरवठा विभागाकडून टॅकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो कमी प्रमाणात व गढूळ येत असल्याने कुयलूवासियांचे हाल संपता संपत नाही.
या ग्रामपंचायतीची लोकसंख्या १८०० च्या आसपास आहे. एक गाव व अधिक पाडे आहेत. कुयलू या मुख्य गावाची ५०० च्या आसपास लोकसंख्या असून या गावात दोन विहीरी आहेत. मात्र, या विहीरीतील पाणी आटल्याने या गावाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावासाठी शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, चार पाच दिवसांतून एकदा टँकरने पाणी येते. तेही एका विहीरीत टाकले जाते.
टँकरने टाकलेले पाणी गढूळ असल्याने ते पाणी पिण्यासाठी वापरत नसल्याने महिलांची पायपीट सुरुच आहे. टँकरने ज्या विहीरीमध्ये पाणी टाकते ती अतिशय खोल असल्याने पाणी काढताना महिलांची दमछाक होत असल्याचे गायत्री मेणे या महिलेने सांगितले. विहिरीजवळ असलेली एकमेव कुपनलिका सुरू असून तिला थेंब थेंब पाणी येते. एक पाण्याचा हंडा भरण्यासाठी एक तास लागतो, अशी माहिती उर्मिला हरड यांनी दिली.
कुपनलिकेला पाणी कमी असल्याने ती हपसण्यासाठी शारिरीक त्रासही सहन करावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील एक विहीर असून या विहिराला जलपर्णीनी विळखा घातला आहे. पाण्यानेही तळ गाठला आहे. तसेच, विहीरही नादुरुस्त असल्याने विहिरीत कोणी उतरत नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
अर्धा किमी अंतरावरून डोक्यावर पाणी आणणे शक्य नसल्याने आम्ही २०० लिटरची पाण्याची टाकी ३५ रूपयाला विकत घेतो, अशी माहिती वयोवृद्ध महिला मंजुळा भोईर यांनी दिली.
याच ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत धावरपाडा असून येथे ३५ घरे असून १५० च्या आसपास लोकसंख्या आहे. या पाड्यात चार दिवसातून एकदा टँकरने पाणी येत असल्याची माहिती येथील ग्रामस्थ हरिश्चंद पतंगराव यांनी दिली. या पाड्यात असलेल्या कुपनलिकेतील पाणी आटल्याचेही त्यांनी सांगितले. चार पाच दिवसांचे पाणी प्यावे लागत असल्याने काही आजार होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
अंघोळ कपडे धुण्यासाठी एका किमी अंतरावर असलेल्या नाल्यावर जावे लागत असल्याचे जर्नादन कोम यांनी सांगितले. या टंचाईमुळे दिवस-रात्र महिलांचा वेळ पाणी भरण्यासाठी जात असल्याने त्यांचा रोजगारही बुडत आहे.
शासनाने टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो नियमाप्रमाणे दिला जात असल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.
अनेक दिवसांचे पाणी आरोग्याला धोका
शासनाच्या नियमाप्रमाणे प्रति माणसी २० लिटर पाणी देण्याचा शासनाचा नियम आहे. या नियमामुळे कमी लोकसंख्या असलेल्या पाड्यात टँकर येण्यासाठी चार ते पाच दिवस लागत असल्याने अनेक दिवसांचे पाणी वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
टँकरने आणलेले पाणी हे स्वच्छ असून याच पाण्याचा वापर अनेक गावपाड्यात केला जात आहे.
-अरूण भांड, ग्रामसेवक
कुयलू ग्रामपंचायत