शक्तिपीठांपैकी एक जीवदानी माता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:36 PM2019-09-29T23:36:32+5:302019-09-29T23:36:50+5:30
विरार येथील जीवदानी डोंगरावर वसलेली जीवदानी माता ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातील अनेक शक्तीपीठांपैकी एक अशी तिची ओळख आहे.
पारोळ/वसई : विरार येथील जीवदानी डोंगरावर वसलेली जीवदानी माता ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातील अनेक शक्तीपीठांपैकी एक अशी तिची ओळख आहे. उंच डोंगरावर कडेकपारीत वसलेल्या या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागते. विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला डोंगरावर जीवदानी माता वसली आहे. सतराव्या शतकापर्यंत येथे जीवधन नावाचा किल्ला होता. कालौघात त्याचे अस्तित्व नष्ट झाले. याच किल्ल्यावरील हे मंदिर. १९५६ मध्ये या मंदिरात भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
तब्बल ९०० फूट उंचावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी १४०० पायऱ्या आहेत. मंदिराचा गाभारा पाच ते सहा फूट उंच पाषाणात खोदलेला आहे. आतमध्ये दगडात कोरलेली देवीची सुबक मूर्ती असून तिच्या डोईवर सुवर्ण मुकुट आहे तर बाजूला त्रिशूळ आहे. मंदिराला लागूनच श्रीकृष्ण गुहा असून त्यालगत डोंगरात खोदलेले मोठे सभागृह आहे. मंदिराच्या बाजूला कालिका माता, भैरवनाथ, वाघोबा आदी देवतांची मंदिरे आहेत. या देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील भाविक येतात. या परिसरात वसलेला आगरी, कोळी, कुणबी, आदिवासी इत्यादी समाज या देवीला आराध्य दैवत मानतात.
नवरात्रात मंदिराला विद्युत रोषणाई आणि दरिदवशी फुलांची आकर्षक सजावट केली जाते. देवी मूर्तीच्या बाजूला पाषाण आहे. या पाषणावर सुपारी चिकटवून देवीचा कौल घेण्यासाठीही भाविक आवर्जून येतात.