एकतर्फी प्रेमातून विद्यार्थीनीवर ब्लेडने वार
By admin | Published: November 3, 2015 01:02 AM2015-11-03T01:02:46+5:302015-11-03T01:02:46+5:30
माहिमच्या भुवनेश किर्तने विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात दहावीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेमामधून शाळेसमोरच तरूणाने ब्लेडने वार करून जखमी केले.
पालघर : माहिमच्या भुवनेश किर्तने विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात दहावीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेमामधून शाळेसमोरच तरूणाने ब्लेडने वार करून जखमी केले. तिला पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सातपाटी सागरी पोलीसांनी अज्ञात तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वडराईच्या (रावलेपाडा) येथील मंजिरी (नाव बदललेले) ही माहीम येथे शिकते. काही दिवसापासून एक तरूण तिच्या मागावर असल्याचे तिच्या लक्षात आले. रविवारी या तरूणाने मंजिरी घरी असताना तिच्या आईच्या मोबाईलवर फोन करून आपण घरी येत असल्याचा निरोप दिला. त्यामुळे घाबरून मंजीरीने दरवाजा बंद करून घेतला. त्या तरूणाने दरवाजा ठोठावून तिला दार उघडण्यास सांगितले. मात्र, तिने मोबाईलवरून मामाला फोन करून ही गोष्ट सांगितल्याने तो तरूण निघून गेला. या घटनेमुळे घाबरलेल्या मंजिरीच्या आईने तिला आणि तिच्या धाकट्या भावाला नंडोरे येथे राहणाऱ्या आपल्या आईकडे (आजीकडे) पाठविले. मात्र त्या रिक्षाचा त्या तरुणाने पाठलाग केला. सोमवारी परीक्षा संपताचबाहेर आलेल्या मंजिरीला त्या तरूणाने गाठले. या दोघांमधील संभाषणानंतर तरूणाने हातातील ब्लेडने मंजीरीच्या डाव्या हातावर ब्लेड मारून तीची नस कापण्याचा प्रयत्न केला. तिने प्रसंगावधान राखत रक्तबंबाळ अवस्थेत शाळेत धावत जात शिक्षीकेला सर्व प्रकार सांगितला. तिच्या नातेवाईकांनी तीला पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.