विदेशातील भारतीयांच्या घरी ऑनलाइन पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:25 AM2020-11-29T00:25:39+5:302020-11-29T00:25:56+5:30
स्वप्नील पंडितांनी डहाणूतून सांगितली पूजा
बोर्डी : कोरोनाचा फटका अनेक व्यवसायांना बसला, तसेच काही व्यवसायांत नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. घरोघरी पूजाअर्चा होत असल्या, तरी कोरोनामुळे पुरोहित घरी जात नाहीत. मात्र, ऑनलाइन पूजेचा नवा पर्याय उपलब्ध आहे. या ऑनलाइन पूजेमुळे केवळ आपल्या जवळपासच्याच नाही तर सातासमुद्रापार परदेशातल्या नागरिकांकडेही पूजा सांगितली जाऊ लागली आहे. डहाणूतील मूळ रहिवासी असलेले हितेश माळी यांच्या अमेरिकेतील घरी झालेल्या पूजेचे पौरोहित्य डहाणूतीलच पुरोहित स्वप्नील पंडित यांनी ऑनलाइन केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्व सण-उत्सव घरी बसून साजरे करावे लागले. विशेषत: गणेशोत्सवात पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली भक्तांनी यू-ट्युब तसेच ऑनलाइनद्वारे श्रींची प्राणप्रतिष्ठा केली. डहाणू आगर येथील पौरोहित्य व्यवसाय करणारे स्वप्नील पंडित हे उच्चशिक्षित आहेत. डहाणूतील भाविका आणि हितेश माळी हे दाम्पत्य आयटी क्षेत्रातील नोकरीकरिता अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे स्थायिक झाले आहे. त्यांना तिथल्या राहत्या घरी पूजाविधी करायची होती. स्वप्नील यांनी त्यांना ऑनलाइन पूजेचा पर्याय सांगताच, तो तत्काळ स्वीकारला. त्यानुसार, पूजाविधी व त्याच्या साहित्याची माहिती देण्यात आली. १९ नोव्हेंबर रोजी अमेरिकन वेळेनुसार पहाटे ५, तर दुपारी साडेतीन वाजता भारतीय वेळेत स्वप्नील यांनी ऑनलाइन पूजा सांगितली. माळी कुटुंबानेही याबाबत समाधान व्यक्त केले.