विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी केवळ 5 टक्के भूसंपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:51 AM2024-04-12T11:51:43+5:302024-04-12T11:51:52+5:30
एमएसआरडीसी : पुणे रिंग रोडसाठी ५० टक्क्यांहून अधिक अधिग्रहण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महाप्रदेशातील पहिल्या प्रवेश नियंत्रित अशा विरार - अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरू केली आहे. मात्र, सद्यस्थितीत या मार्गिकेसाठी सुमारे पाच टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. मुंबई महाप्रदेशात जमिनीचे दर अधिक असल्याने भूसंपादन करताना यंत्रणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी एमएसआरडीसीने तब्बल ५० टक्क्यांहून अधिक भूसंपादन केले आहे.
एमएसआरडीसी विरार ते अलिबागदरम्यान १२८ किलोमीटर लांबीचा बहुउद्देशिय वाहतूक मार्ग उभारणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात वसई येथील नवघर ते पेण तालुक्यातील बलावली गावादरम्यान ९६ किलोमीटर लांबीचा महामार्ग उभारला जाईल. या महामार्गासाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यात भूसंपादनासाठी २२ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील ९६ किमी लांबीच्या मार्गाचे काम ११ पॅकेजमध्ये केले जाणार आहे. या अकरा पॅकेजच्या उभारणीसाठी १९ हजार ३३४ कोटी रुपयांच्या निविदा एमएसआरडीसीने यापूर्वीच काढल्या आहेत. आता १८ एप्रिलला या निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. मात्र, या प्रकल्पासाठी भूसंपादनात अडथळे येत आहेत.
जमिनीचे दर अधिक म्हणून...
मुंबई महाप्रदेशात जमिनीचे दर अधिक असल्याने भूसंपादनावेळी दरांवरून जमीन मालकांकडून हरकती दाखल केल्या जात आहेत. तसेच काही भागात प्रकल्पासाठी जमिनी देण्यास नकार दिला जात आहे. त्यातून भूसंपादन करताना यंत्रणांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातून सद्यस्थितीत केवळ ५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. मात्र, मेअखेर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान, पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. निम्म्याहून अधिक जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित जमिनीची भूसंपादन प्रक्रिया लवकरच पूर्ण करून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.