राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाची फक्त औपचारिकताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 02:48 AM2018-05-02T02:48:04+5:302018-05-02T02:48:04+5:30
राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्त वाहतूक पोलिसांच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती सुरु असून त्यानिमित्ताने रविवारी रॅलीचेही आयोजन केले होते
आरिफ पटेल
मनोर : राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्त वाहतूक पोलिसांच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती सुरु असून त्यानिमित्ताने रविवारी रॅलीचेही आयोजन केले होते. आठवडाभर ही औपचारिकता दिसणार असून त्यानंतर पुन्हा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर धुमाकुळ घालणारे वाहनचालक व त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस पहावयास मिळतील असे येथील सुजाण नागरिकांचे म्हणने आहे.
नुकताच हा दिवस वाहतूक नियंत्रण शाखा दुर्वेस मनोर येथे उत्सहात साजरे करण्यात आला. आमदार विलास तरे, शिवसेना जिल्हाप्रमुख (ग्रामिण) वसंत चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, ही दरवर्षीची औपचारिकता ठरत असून खऱ्या अर्थाने वाहतूकीचे नियम व रस्ते सुरक्षा हा विषय हाताळला जात नसल्याची स्थितीती गत वर्षभरामध्ये वाहतूक विभागामार्फत झालेली दंडात्मक कारवाईची आकडेवरीत सांगते आहे.
या सप्ताहाच्या निमित्तात पोलीस दलाच्या वाहतूक शाखेकडून विद्यार्थी व नागरिकांना मोटर वाहन कायद्याचे नियम, सुरक्षितता, अपघातग्रस्तांना कशी मदत करावी या बाबत माहिती व प्रात्यक्षिक दाखविले जाते. मात्र, इतर दिवशी दुर्वेस, कासा, तलासरी, चिंचोटी, वसई व पालघर ट्रिपल सिट बाईक स्वार, ओव्हर टेक, पकडल्यावर परवाना दाखविण्या आगोदर चिरीमिरी हे चित्र नेहमीचे झाले आहे.
उपलब्ध माहितीनुसार महामार्ग पोलीस, मनोर यांच्या हद्दीमध्ये २०१७ या वर्षामध्ये १३,८१९ मोटार वाहन केसेस झाल्या असून अपघातांची संख्या १०२ आहे. त्यात १९ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण गंभीर जखमी झाले होते. वर्ष २०१८ मध्ये (मार्च पर्यंत) २७ अपघातांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. यात १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.