११३८ कारखान्यांसाठी केवळ एक क्षेत्र अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:48 PM2019-07-26T22:48:06+5:302019-07-26T22:49:09+5:30

भयाण वास्तव : प्रदूषणात पहिल्या क्रमांकावर असलेल्या तारापूरकडे दुर्लक्ष

Only one field officer for the factories | ११३८ कारखान्यांसाठी केवळ एक क्षेत्र अधिकारी

११३८ कारखान्यांसाठी केवळ एक क्षेत्र अधिकारी

Next

पंकज राऊत

बोईसर : प्रदूषण पातळीत देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या अतिसंवेदनशील अशा तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय, तारापूर १ मध्ये सुमारे ११३८ कारखान्यांकरिता फक्त एकच क्षेत्र अधिकारी (फिल्ड आॅफिसर) कार्यरत आहे. पर्यावरणासंदर्भात प्र.नि.मंडळच गंभीर नसल्याने सर्वत्र आश्चर्य तसेच संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत तारापूर १ व २ अशी उपप्रादेशिक कार्यालये आहेत. त्यापैकी उपप्रादेशिक कार्यालय, तारापूर १ च्या अंतर्गत औद्योगिक क्षेत्र येत असून ते अतिसंवेदनशील आहे. असे असूनही सद्यस्थितीत येथे एकच क्षेत्र अधिकारी असून त्याच्यावर परिसरातील तक्रारी, संमतीपत्र, अर्ज आणि माहिती अधिकारांतर्गत येणाऱ्या अर्जाचा वेळच्यावेळी निपटारा करणे, कोर्ट कचेरी, कारखाना निरीक्षण, सांडपाण्याचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीकरता पाठवणे, विधानसभेतील प्रश्न, प्रदूषणकारी घटकांचे प्रकार तयार करून वरिष्ठांनी पाठविणे इत्यादी अनेक कामाच्या जबाबदारी आहेत.

मंडळाच्या कार्यालयीन आदेशानुसार या कार्यालयात यापूर्वी पाच क्षेत्र अधिकाऱ्यांची नेमणूक होती. परंतु सध्या येथे फक्त दोन क्षेत्र अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी एक क्षेत्र अधिकारी अर्जुन जाधव यांना उपप्रादेशिक अधिकारी तारापूर २ या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला असल्याने त्यांना तारापूर १ कडे फारसे लक्ष देता येत नाही.

सुमारे ११३८ कारखान्यांत होणाºया प्रदूषणावर म.प्र.नि. मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय, तारापूर १ च्या माध्यमातून नियंत्रण आणि अंकुश ठेवण्यात येते. मात्र, रिक्त पदांमुळे कार्यालयाच्या कामकाजावर विपरित परिणाम झाला आहे. सध्या तानाजी पाटील हे एकच क्षेत्र अधिकारी पूर्णवेळ कार्यरत असून मनुष्यबळ अत्यंत अपुरे आहे. या कार्यालयातील कामाची प्रचंड व्याप्ती पाहता आणखी चार पूर्णवेळ क्षेत्र अधिकाºयांची तातडीने नेमणूक होणे ही अत्यंत गरजेचे आहे.

पूर्णवेळ ५ क्षेत्र अधिकाºयांची गरज असताना मोजक्या क्षेत्र अधिकाºयांमार्फत कामकाजाचा गाडा चालविला जात असल्याने प्रदूषण नियंत्रणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष व्हावे, याकरिता रिक्त पदे भरली जात नाहीत ना अशीही शंका तारापूरमधील जागरुक नागरिक व्यक्त करीत आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे येथील तत्कालीन प्रादेशिक अधिकारी लाड यांना म.प्र.नि.मंडळ मुख्यालयाचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी यांनी आॅगस्ट, २०१८ मध्ये आदेश दिल्यानंतर लाड यांनी दि.२७ आॅगस्ट १८ ला कार्यालयीन आदेश (क्र .१/२०१८) काढून उपप्रादेशिक कार्यालय ठाणे १ व उपप्रादेशिक कार्यालय तारापुर २ या दोन कार्यलयातील चार क्षेत्र अधिकाºयांना आठवड्यातून प्रत्येकी २ तर १ अधिकाºयांना एक दिवस अतिरिक्त आळीपाळीने तात्पुरता कार्यभार देऊन काम चालविले. मात्र, आज जैसे थे परिस्थिती आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर एक कार्यालयामध्ये अतिरिक्त क्षेत्र अधिकारी मिळावेत याबाबत वरिष्ठांशी चर्चा झाली आहे. लवकरच क्षेत्र अधिकाºयांची नेमणूक करण्यात येईल. - धनंजय पाटील, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे व पालघर

Web Title: Only one field officer for the factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.