पालघर जिल्ह्यामधील एकमेव प्लाझ्मा रक्तपेढीला लागली घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:09 AM2020-11-24T00:09:44+5:302020-11-24T00:10:10+5:30
हे एकंदर गणित पाहता ते न परवडणारे असल्याने प्लाझ्मा गोळा करण्याचे काम साथीया रक्तपेढीने थांबविले आहे.
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : पालघर जिल्ह्यात एकमेव नालासोपारा येथे साथीया ट्रस्टची प्लाझ्मा गोळा करणारी रक्तपेढी आहे. शिवाय मुंबई महानगर प्रदेशातील ही पहिलीच रक्तपेढी आहे. मात्र प्लाझ्मा दात्यांशी संपर्क साधणे, त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार करणे, त्यांनी सकारात्मकता दाखविल्यानंतर तो गोळा करणे याकरिता मनुष्यबळ आणि यंत्रांची आवश्यकता असून वेळ व खर्च अधिक होतो. दरम्यान, साडेपाच हजार या शासकीय दराने त्याची विक्री करावी लागते.
हे एकंदर गणित पाहता ते न परवडणारे असल्याने प्लाझ्मा गोळा करण्याचे काम साथीया रक्तपेढीने थांबविले आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे पालघर जिल्ह्यात प्लाझ्मा गोळा होत नसल्याने, ही चिंतेची बाब आहे. याकरिता जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या रक्तपेढीला नवसंजीवनी देण्याकरिता पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत नालासोपारा येथील साथीया ट्रस्ट रक्तपेढीचे चेअरमन विजय महाजन यांनी व्यक्त केले.
कोण देऊ शकतो प्लाझ्मा?
पॉझिटिव्ह व्यक्ती उपचारानंतर बरी झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा देऊ शकतो. प्लाझ्मा देण्यासाठी त्या व्यक्तीची हिमोग्लोबीनची पातळी चांगली असावी लागते.
प्लाझ्मा दान करण्यासाठी अन्टीबॉडी टेस्ट आणि प्लाझ्मा संकलित करण्यासाठी
तीन तासांचा कालावधी लागतो.
प्लाझ्मादात्यांशी संपर्क साधने, त्यानंतर उपलब्ध प्लाझ्मा गोळा करणे व साठवणे या प्रक्रिया खूपच खर्चिक आहेत. शिवाय शासकीय दराने विक्री केली जात असल्याने परवडत नाही. प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्याने प्लाझ्मा शिल्लक नाही.
- विजय महाजन, चेअरमन, साथीया ट्रस्ट
शासकीय धोरण मारक ठरले असून प्लाझ्मा गोळा करणे खर्चिक ठरत असल्याने आता प्लाझ्मा शिल्लक नाही.